जमीन हडपणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश

By Admin | Updated: March 26, 2015 00:48 IST2015-03-26T00:48:47+5:302015-03-26T00:48:47+5:30

गरजू शेतकऱ्यांना शोधून त्यांना काही रक्कम द्यायची, त्यानंतर ती रक्कम शेतकरी परत करू शकत नसल्याने ..

The land grab rocket exposed | जमीन हडपणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश

जमीन हडपणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश

वरोरा : गरजू शेतकऱ्यांना शोधून त्यांना काही रक्कम द्यायची, त्यानंतर ती रक्कम शेतकरी परत करू शकत नसल्याने सातबारावर कर्जाचा बोजा असतानाही अत्यल्प भावात जमिनीची विक्री करणाऱ्या रॉकेट वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहा शेतकऱ्यांची ११.८४ हेक्टर आर जागा हडपणाऱ्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी वरोरा पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जमीन हडप करणाऱ्या माफीयांत चांगलीच खळबळ उडाली आहे. वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील बळीराम विश्वनाथ महाकुळकर (७१) या शेतकऱ्याची निमसडा येथील शेत सर्वे क्र ३० भो.वर्ग मध्ये ३.२४ हेक्टर जमीन आहे. बळीराम यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी रूपेश अशोक ढोके याच्याकडे दीड लाख रुपयात गहाण ठेवली. यामध्ये रूपेश ढोके सोबत सुभाष वाटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगमत करून इसारपत्र करून देण्याचा बहाना करीत खोटे कागदपत्र तयार केले व ३.२४ हेक्टर शेत जमीनीची रजिस्ट्री करून घेतली.
तसेच तालुक्यातील दहेगाव येथील जिजाबाई बालाजी वांढरे ही महिला आपली १.५० हेक्टर शेतजमीन ७० हजार रूपयात गहाण ठेवण्यासाठी गेली असता, तात्पुरता इसारपत्र करावा लागते, असे सांगत पृथ्वीराज धर्मा भगत, सुभाष बिजाराम वाटकर व अशोक मोतीराम चिमनकर यांनी संगनमत करून जिजाबाई वांढरे यांच्या अज्ञानाचा फायदा घेत विक्री करून घेतली. चिकणी येथील नानाजी खेजाजी टोंगे यांची तीन हेक्टर शेत जमीन दीड लाख रुपये देवून गहाण ठेवण्यासाठी गेले. तेव्हा विक्री पत्रावर पाच लाख रुपये दर्शवून इसार पावती करून घेतो असे म्हणून नानाजी टोंगे यांना काहीही वाचून न दाखविता जगदीश दौलत कामडी, दादा करड, रविंद्र डोंगरे, जयदेव बोढाले यांनी संगनमत करून जमिनीची विक्री करून घेतली. दहेगाव येथील नारायण ठमके यांची २.३३ हेक्टर जमीन कल्पना नंदकिशोर निब्रड, दादा करडक, सुभाष वाटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगनमत करून ५० हजार मोबादला देवून विक्री पत्रावर चार लाख रुपये किंमत दर्शविली. या प्रकरणातही ठमके यांना कोणतेही कागदपत्रे वाचून दाखविले नाही व रजिस्ट्रार कार्यालयातून शेतीची सरळ विक्री करून घेतली. शेगाव येथील गौरव नानाजी लुन्ने यांची १.४८ हेक्टर जमीन एक लाख रुपयाचा मोबदला देत विक्रीपत्रावर चार लाख रुपये किंमत दर्शवून अशोक नानाजी पारधी, रविंद्र डोंगरे व जयदेव बोढाले यांनी विक्री करून घेतली. मेसा येथील यशवंत दयाराम वरभे यांची ३.२९ हेक्टर जमीन त्यांच्या वडीलास भुलथाप देऊन कोणताही मोबदला दिला नाही. विक्री पत्रावर तीन लाख ९५ हजार रुपये दर्शवून अन्नु विनोद खोब्रागडे, अन्नपूर्णा श्रावण पाटील, आनंद राघोबा आसुटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगनमत करून जमिनीची विक्री करून घेतली. फसगत झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी १३ जणांवर कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्जाचा बोझा तरी जमिनीची केली विक्री
सातबारावर कर्जाचा बोझा असतानासुद्धा जमिनीची विक्री करण्यात आली. त्यामुळे कर्जाचा बोझा नसलेले सातबारा आले कसे हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. असेच अनेक प्रकार वरोरा तालुक्यात घडले असून त्याची तक्रार नसल्याने प्रकरण समोर आले नाही. मात्र आता या रॉकेटचा पर्दाफाश झाल्याने या प्रकरणात आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The land grab rocket exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.