अल्पावधीतच वाहून गेला लाखो रूपयांचा बंधारा
By Admin | Updated: September 14, 2016 00:49 IST2016-09-14T00:49:24+5:302016-09-14T00:49:24+5:30
मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु ...

अल्पावधीतच वाहून गेला लाखो रूपयांचा बंधारा
ग्रामस्थांनी केली तक्रार : अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी
भेजगाव : मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु आर्थिक सत्रात जवळपास सात लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा अल्पावधीतच वाहून गेल्याने ग्रामपंचायती विरोधात शेतकऱ्यांत रोष पसरला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असून दरवर्षी दुष्काळामुळे होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक व्हावी, त्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, पाणी अडून तिथेच जिरावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारामुळे या योजनेला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार केलेली मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सात लाख रुपये खर्च करून पाच महिन्यापूर्वी बापूजी बामणे यांच्या शेताजवळील नाल्यावर बंधारा बांधला. यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून बंधाऱ्याचे काम नित्कृष्ठ झाल्याने पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
सदर बंधाऱ्याचे काम ग्रामसेवक, कंत्राटदार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे अंदाजपत्रकानुसार सिमेंट क्राँक्रीट वापरले नाही. माती मिश्रीत नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन बांधकाम केल्याने बंधारा अल्पावधीतच वाहून गेला. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी न साचता पाणी उमा नदीला वाहून गेले. परिणामत: दुष्काळस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बंधारा कामाची चौकशी करून ग्रामसेवक, कंत्राटदारावर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सीईओ यांना दिलेल्या निवेदनातून बाबुराव जरातेसह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)