लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात
By Admin | Updated: November 7, 2016 01:34 IST2016-11-07T01:34:34+5:302016-11-07T01:34:34+5:30
शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष,

लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात
कापूस, सोयाबीनला अत्यल्प भाव : शासकीय दर निश्चित करा
गडचांदूर : शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष, शेतमालाची कवडीमोल भावाने विक्री, व्यापाऱ्याकडून लूट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
यावर्षी खरीप हंगमात चांगले उत्पन्न होईल, अशी आशा बळीराजाला होती. कापूस सोयाबीन पीक चांगले होते. मात्र निसर्गाने वक्रदृष्टी दाखवून तोंडी आलेला घास हिरावून नेला. अतिवृष्टीने कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दिवाळी सण आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कवडीमोल भावाने विकले. उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. सोयाबिन शेतात तयार झाले तेव्हाच अतिवृष्टी झाली व सोयाबीनची प्रत बिघडली. यात शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना नुकसान सहन करावा लागले. व्यापाऱ्यांनी मात्र सोयाबिन निकृष्ट दर्जाचे असल्याने कवडीमोल भावाने खरेदी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अतिवृष्टीने खराब झालेल्या सोयाबिनची शासकीय दराने खरेदी करावयास पाहिजे होती. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने सोयाबिनची विक्री नाईलाजास्तव करावी लागली. उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यापुढे प्रचंड आर्थिक संकट उभे आहे. कर्ज कसे फेडावे, ही चिंता आहेच. (वार्ताहर)
मुख्यमंत्री गप्प का ?
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना विधानसभेवर शेतकरी दिंडी काढून सोयाबिनला सहा हजार भाव मागितला होता. एक लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले होते. मग आता सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सोयाबिनला सहा हजार भाव का देत नाही, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.