‘त्या’ तरुणीची ओळख पटली ?
By Admin | Updated: May 5, 2016 01:23 IST2016-05-05T01:23:38+5:302016-05-05T01:23:38+5:30
जळालेल्या तणसाच्या ढगात अर्धवट जळालेल्या तरुणीची ओळख पटली असून ती जवळच्या किरमिटा येथील असल्याची माहिती आहे.

‘त्या’ तरुणीची ओळख पटली ?
पोलीस संभ्रमातच : नातेवाईकांनी केली पुष्टी
नागभीड : जळालेल्या तणसाच्या ढगात अर्धवट जळालेल्या तरुणीची ओळख पटली असून ती जवळच्या किरमिटा येथील असल्याची माहिती आहे. तिच्या नातेवाईकांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयातून तिच्या शिल्लक राहिलेल्या कापडाच्या तुकड्यावरुन ही ओळख पटवल्याचीही माहिती आहे. पण पोलिसांनी या बाबीस दुजोरा दिलेला नाही.
मंगळवारी पांजरेपार येथील एकनाथ भाऊजी उरकुडे हे आपल्या शेतात बैलबंडीने तणस आणण्यासाठी गेले असता त्यांचा तणसाचा ढग जळालेला आढळून आला व त्या ढगात एका तरुणीचे प्रेतही जळालेल्या अवस्थेत दिसून आले.
लागलीच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी प्रेत नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले.
दरम्यान, किरमिटी येथील एक तरुणी रविवार पासून गावात नसल्याची बाब पोलिसांना समजली. पोलिसांनी चौकशीचा एक भाग म्हणून अधिक चौकशी केली असता किरमिटी येथील तरुणी गावात नसल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना विचारणा केली असता रविवारी ११.३० वाजतादरम्यान तिला एक भ्रमणध्वनी आला व ती १२ वाजता घरुन गेल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते.
दरम्यान, हे नातेवाईक येथील ग्रामीण रुग्णालयात आले व तिच्या अंगावर उरलेल्या कापडाच्या तुकड्यावरुन तीच असल्याचे सांगितले, अशी माहिती आहे. बुधवारी हे नातेवाईक गावच्या प्रमुख व्यक्तींसह पोलीस ठाण्यात हजर होते.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रेताची अवस्था लक्षात घेता उत्तरीय तपाणी करण्यास असमर्थता दर्शविल्याने सदर तरुणीचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
मुलगी तीच आहे असे आज तरी म्हणता येणार नाही. आमचा तपास सुरु आहे. अन्य बाबीवरुनही ओळख पटविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- मनोज मेश्राम,
पोलीस अधिकारी पो.स्टे. नागभीड