रॅलीकरांशी चर्चेतून प्रकटला व्याघ्र अभ्यासाचा अभाव
By Admin | Updated: October 29, 2015 01:27 IST2015-10-29T01:27:42+5:302015-10-29T01:27:42+5:30
वाघाचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वनविभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली बुधवारी चंद्रपुरात दाखल झाली.

रॅलीकरांशी चर्चेतून प्रकटला व्याघ्र अभ्यासाचा अभाव
रॅलीचा अनुभव अविस्मरणीय : अलायन्स रायडिंग नाईट्स संस्थेच्या सदस्याचे मत
चंद्रपूर : वाघाचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वनविभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली बुधवारी चंद्रपुरात दाखल झाली. मात्र या रॅलीतील सदस्य पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने पत्रकार विरूद्ध रॅलीकर असा विचित्र प्रसंग निर्माण झाला.
वाघांच्या बचावासाठी जनजागृती करण्यासाठी निघालेल्या या रॅलीतील सदस्यांमध्येच व्याघ्रसंवर्धनासंदर्भात आणि वाघांच्या कॅरिडोरमधील परिस्थितीच्या अभ्यासाचा अभाव असल्याचे चित्र प्रगटले. पत्रकार परिषदेअखेर मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी हे मान्य करीत रॅलीकरांनी जनजागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतूक केले व त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, वनासोबतच व्याघ्र संवर्धन हा संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचा उद्देश या रॅली असल्याचे सांगून, हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे अलायन्स रायडींग नाईट्स या संस्थेच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, विभागीय वन अधिकारी एस.एस.पाटील, उपसंचालक कोर ताडोबा-अंधारी अमित कळस्कर, उपसंचालक बफर जी.पी.नरवणे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वन अधिकारी आर. टी. धाबेकर, सहाय्यक वनसंरक्षक अभय बडकेलवार, राजीव पवार, विवेक मोरे, कांचन पवार व कुळकर्णी हजर होते.
दरम्यान, ही रॅली चंद्रपुरात पोहचली असता, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे व मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. रॅलीत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व युकोप्रोचे बंडू धोत्रे व त्यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
२४ आॅक्टोंबर रोजी महाराष्ट्र रायगड संवर्धन संदेश जनजागृती रॅलीचा जेष्ठ अभिनेते व राज्याचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून मुंबईतून शुभारंभ केला. अलायन्स रायडींग नाईट्स मुंबई या संस्थेचे २० व नागपूर येथील ३ दुचाकीस्वार सहभागी झाले आहेत. या रॅलीत राजु तेलंग, हर्षिनी कान्हेकर, प्रणिश तुरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, व्हिक्टर पॉल, ओमयार वाच्छा, श्रीराम गोपालकृष्णन, शार्दुल चामकाटे, शहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितू गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंद्रन ठाकुर, दीपक ग्रेगथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग व अभिजीत पी. यांचा समावेश आहे.व्याघ्रसंवर्धन व वनसंवर्धन हा संदेश घेऊन ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन ब्रम्हपुरी, सिंदेवाही मार्गे बुधवारी मोहूर्लीत पोहोचली. २९ आॅक्टोंबरला सकाळी भद्रावती, वरोरा व आनंदवन येथे जनजागृती करुन ही रॅली वणीला रवाना होईल. (जिल्हा प्रतिनिधी)