सैनिकी कोविड केंद्रात सुविधांचा अभाव, औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:56+5:302021-04-27T04:28:56+5:30
विसापूर : जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेची त्सुनामी आल्याने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बल्लारपूर तालुक्यातील भीवकुंड(विसापूर) येथील शासकीय सैनिकी ...

सैनिकी कोविड केंद्रात सुविधांचा अभाव, औषधांचा तुटवडा
विसापूर : जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेची त्सुनामी आल्याने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बल्लारपूर तालुक्यातील भीवकुंड(विसापूर) येथील शासकीय सैनिकी शाळा येथे ४०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. सध्या तिथे ३१० रुग्ण उपचार घेत आहेत. पूर्वीसारखी तिथे सुविधा नसल्याने रुग्णांसह उपचार करीत असलेल्या डॉक्टरांचे सुद्धा हाल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर दिसत आहे.
पुरेसा औषधीसाठा नसल्याने काही रुग्णांनी भ्रमणध्वनीद्वारे याबाबतची माहिती ‘लोकमत’ला दिली. प्रत्यक्ष तिथे भेट दिली असता खोकल्याचे औषध व इतर ॲण्टिबॉडीज औषधांचा तुटवडा जाणवला. ही बाब रुग्णांच्या जीवावर बेतणारी असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांचे थेट लक्ष या सेंटरवर होते. त्यांच्यामार्फत केंद्रप्रमुख, सहायक, सफाई कामगार व त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यांच्यामार्फत रुग्णांची नोंद त्यांना लागणारे दैनंदिन आहार व इतर प्रशासकीय बाबींवर त्यांची देखरेख होती. परंतु, आता हे सर्व कार्य डॉक्टर व परिचारिकांना करावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना विश्रांतीसाठी सैनिकी शाळेने खोल्यासुद्धा दिलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांमध्येच त्यांना राहावे लागत आहे. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मुबलक औषध साठा व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावे तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता भासत असल्यामुळे १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.