ंआता लक्ष मनपा निवडणुकीकडे !

By Admin | Updated: February 26, 2017 00:38 IST2017-02-26T00:38:36+5:302017-02-26T00:38:36+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, निकालाची उत्सुकता संपली आहे. मिनी मंत्रालयातील राजकीय सारीपाट स्पष्ट झाला आहे.

Lack of attention to the election! | ंआता लक्ष मनपा निवडणुकीकडे !

ंआता लक्ष मनपा निवडणुकीकडे !

मनपा हद्दीत नव्याने मोर्चेबांधणी : मिनी मंत्रालयाची रणधुमाळी थांबली
चंद्रपूर : जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, निकालाची उत्सुकता संपली आहे. मिनी मंत्रालयातील राजकीय सारीपाट स्पष्ट झाला आहे. भाजपाने झेंडा रोवला आहे. आता चंद्रपूरकरांचे लक्ष मनपा निवडणुकीकडे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून बोध घेत आता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नव्याने व्युहरचना आखणे सुरू केले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूणच आता सर्व पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीची मरगळ झटकून मनपा निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी २३ फेब्रुवारीच्या निकालानंतर थांबली आहे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ तर पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७१ एवढ्या जागांवर वर्चस्व सिध्द केले. मिनी मंत्रालयात भाजपाची सत्ता बसेल, हे निर्विवाद आहे. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांना चांगलाच हादरा बसला. या पक्षांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आता चंद्रपूर महानगरपालिकेचीही निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या चुकांची मनपा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नव्याने व्युहरचना करण्यात व्यस्त झाले आहेत. प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरणे सुरू केले आहे. भल्या सकाळीच हे नगरसेवक आता वॉर्डात नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. एकूणच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण पुन्हा ओबीसी महिलांसाठी राखीव आल्याने महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या पुरुष उमेदवारांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यांना पुन्हा पुढील अडीच वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान महिला नगरसेविका व काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फेरफटका मारणे सुरू केले आहे.
कधी नव्हे ते भल्या सकाळीच हे नगरसेवक वॉर्डात नागरिकांशी बोलताना दिसत आहे. आपली केलेली कामे सांगतानाच विरोधक कसे विकासकामे करताना पाय खेचतात, हेही आवर्जुन सांगताना दिसत आहेत. यंदा प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे पूर्वीच्या प्रभागात अनेक नवा परिसर समाविष्ट झाला आहे. त्यामुळे नव्या परिसरात जाऊन विद्यमान नगरसेवक तेथील नागरिकांमध्ये जनसंपर्क वाढविताना दिसत आहे. यासोबतच जिल्हा परिषद निवडणुकीवरून बोध घेत इच्छुक नगरसेवकांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)

एकटे लढणार की आघाडी करणार ?
विधानसभेचे उपगेटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे १५ नगरसेवक व काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठकही यापूर्वी पार पडली. या बैठकीत काँग्रेसजणांनी कुणाशीही आघाडी न करता मनपाच्या सर्व ६६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला हात पत्कारावी लागली. त्यामुळे या मनपा निवडणुकीत आघाडी करून निवडणूक लढविणार काय, याबाबतचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Lack of attention to the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.