पुरातत्व विभागाकडे मजुरांची एक कोटींची मजुरी थकीत

By Admin | Updated: June 3, 2017 00:37 IST2017-06-03T00:37:08+5:302017-06-03T00:37:08+5:30

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुरातन स्मारकांची दुरुस्ती व बांधकामाकरिता विभागातर्फे मजुरांना कामावर लावण्यात आले.

The laborers of the Archeology Department are tired of one crore wages | पुरातत्व विभागाकडे मजुरांची एक कोटींची मजुरी थकीत

पुरातत्व विभागाकडे मजुरांची एक कोटींची मजुरी थकीत

रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मजुरीच्या प्रतीक्षेत मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुरातन स्मारकांची दुरुस्ती व बांधकामाकरिता विभागातर्फे मजुरांना कामावर लावण्यात आले. हे काम मजुरांनी जुलै ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत पूर्ण केले. परंतु, सात महिने उलटून गेले तरी भारतीय पुरातत्व विभागाने जवळपास २०० ते २५० मजुरांचे अंदाजे एक कोटी रुपयांची मजुरी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळे मजुरांचे थकीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेले गोंडकालीन किल्ले, महाकाली मंदिर, मार्कंडेश्वर मंदिर, पठाणपूरा गेट, अंचलेश्वर मंदिर, ताडबन, निंबाळकर वाडी, बिनबा गेट इत्यादी ठिकाणाचे बांधकाम भारतीय पुरातत्व विभागाद्वारे करण्यात आले. या कामावर २०० ते २५० मजूर लावण्यात आले होते. हे काम जुले ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत पूर्ण करण्यात आले. परंतु, सात महिने लोटूनही या मजुरांचे एक कोटी रुपये अजून विभागाकडे थकीत आहेत.
याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. परंतु अजुनही मजुरांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मजुरामध्ये असंतोष वाढत आहे.
त्यामुळे मजुरांची थकीत मजुरी त्वरीत देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव गोपाल रायपुरे, नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, रिपाई (ए) चे कार्याध्यक्ष जयप्रकाश कांबळे, रिपाई जिल्हा संघटक लाजर कांबळे, युवक आघाडी जिल्हा महासचिव बबन सुरुशे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष रामटेके, मजुरांचे प्रतिनिधी काशिनाथ नामदेव चावरे, जहांगीर सिद्धीकी, सादीक शेख, क्रिष्णा शेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: The laborers of the Archeology Department are tired of one crore wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.