प्रयोगशाळा, ग्रंथालयाविना विद्यालय

By Admin | Updated: August 6, 2014 23:44 IST2014-08-06T23:44:35+5:302014-08-06T23:44:35+5:30

प्रत्येक विद्यार्थ्याला अत्याधुनिकपद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आरटीई अ‍ॅक्ट २००९ सुद्धा अंमलात आणला आहे. मात्र काही शिक्षण संस्थाचालक केवळ अनुदान मिळेल,

Laboratory, School without library | प्रयोगशाळा, ग्रंथालयाविना विद्यालय

प्रयोगशाळा, ग्रंथालयाविना विद्यालय

चंद्रपूर : प्रत्येक विद्यार्थ्याला अत्याधुनिकपद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आरटीई अ‍ॅक्ट २००९ सुद्धा अंमलात आणला आहे. मात्र काही शिक्षण संस्थाचालक केवळ अनुदान मिळेल, या आशेवर विद्यालय सुरु करून कोणत्याही सुविधा न पुरविता विद्यार्थ्यांच्या भविष्याची अक्षरश: खेळ करीत आहे. जिल्ह्यातील अशा अनेक शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
चंद्रपूर येथून सात कि.मी. अंतरावर असलेल्या लोहारा येथील सम्राट अशोक हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा वेगळीच आहे.
या शाळेमध्ये दहाव्या वर्गात ६२, नवव्या वर्गात १७ आणि आठव्या वर्गात केवळ एक विद्यार्थी ज्ञानर्जन करीत आहे. ज्या इमारतीमध्ये शाळा आहे. त्या इमारतीमध्ये तळमजला आणि पहिल्या माळ्यावर अनेक कुटुंबियांचे वास्तव्य आहे. येथेच शाळा भरते. समोर मोठे पटांगण आहे. मात्र सदर पटांगण संस्थेच्या मालकीचे नसल्याने त्याचा वापर होत नाही. विशेष म्हणजे, दुसऱ्या माळ्यावर शाळा असतानाही विद्यार्थ्यांचे मुत्रीघर तळमजल्यावर आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिंंनीसाठी एकच शौचालय आहे. या समस्या असल्या तरी ज्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते त्या क्षमतेसाठी शैक्षणिक साहित्य आणि वातावरणाची गरज असते. ते येथे नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही.
अडगळीत असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे. तेथे प्रयोगशाळा तसेच ग्रंथालयसुद्धा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिसापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी लोहारा गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी शाळेसंदर्भात सीईओंकडे तक्रार केली होती. या तक्रारीची त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित शाळेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने या शाळेची तपासणी केली असता, अनेक त्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शाळा तपासणी पथकामध्ये उपशिक्षणाधिकारी माध्यमिक टेभुंर्णे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक फटिंग, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी आदींचा समावेश होता.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Laboratory, School without library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.