कोठारीच्या महिला डॉक्टरची तडकाफडकी उचलबांगडी
By Admin | Updated: October 11, 2014 23:02 IST2014-10-11T23:02:22+5:302014-10-11T23:02:22+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी असभ्य वर्तन करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

कोठारीच्या महिला डॉक्टरची तडकाफडकी उचलबांगडी
कोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी असभ्य वर्तन करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
१० आॅक्टोबरला मारोती चंदावार रुग्ण उपचारासाठी कोठारी येथील आरोग्य केंद्रात आला. मात्र दवाखान्यात गेला असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहलता रेड्डी यांनी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. उलट रुग्णासह त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला अर्वाश्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची वार्ता गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. डॉक्टरच्या अशा असभ्य वर्तनाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
कोठारीचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.रायपुरे उच्च शिक्षणासाठी गेले असल्याने त्यांचा तात्पुरता कार्यभार डॉ. गवाने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर यापूर्वी वादग्रस्त ठरून बदली झालेल्या डॉ. स्नेहलता रेड्डी यांना कोठारीत पुन्हा पाठवून त्यांच्या खांद्यावर रुग्णांच्या उपचाराचा भार देण्यात आला. मात्र डॉ. रेड्डी यांच्या कार्यशलीत तसुभरही सुधारणा झाली नाही. त्यांनी कोठारीत रुजू झाल्यापासून रुग्णांशी असभ्य वागणूक सुरू केली. वेळीअवेळी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येथे उपचारासाठी कशाला येता असे म्हणून शिवीगाळ करणे, रुग्णांची तपासणी न करता औषधी देणे, घरी बोलविण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना अशोभनीय शब्दात बोलून रुग्णांना दवाखान्यातून हुसकावून लावणे आदी प्रकार सुरू केले. अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाली. त्यामुळे गावकरी संतापले. १० आॅक्टोबरला घडलेल्या घटनेनंतर डॉ.रेड्डी व तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सहाय्यक आरोग्य संचालक डॉ. दीपक सेलोकर यांना कोठारीत पाठविले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन डॉ. स्नेहलता रेड्डी यांना हटवून त्यांचा तात्पुरता कार्यभार विसापूर येथील डॉ.कुकडपवार यांचेकडे सोपविला. डॉ. स्नेहलता रेड्डी या नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. कोठारीत रुजू होण्यापूर्वी त्या चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना तेथेही त्यांचे वर्तन असेच होते. तेथे जनआंदोलन झाल्यानंतर त्यांना कोठारीत पाठविण्यात आले होते. (वार्ताहर)