कोठारीवासीयांचे आतापासूनच पाण्यासाठी हाल
By Admin | Updated: September 10, 2015 00:54 IST2015-09-10T00:54:38+5:302015-09-10T00:54:38+5:30
तालुक्यातील कोठारी हे प्रमुख गाव आहे. गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या आसपास असून ग्रामपंचायतीचे पाच वार्ड व १३ सदस्य आहेत.

कोठारीवासीयांचे आतापासूनच पाण्यासाठी हाल
सुरेश रंगारी कोठारी
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी हे प्रमुख गाव आहे. गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या आसपास असून ग्रामपंचायतीचे पाच वार्ड व १३ सदस्य आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गावात सध्या विविध समस्यांनी थैमान घातले आहे. त्यापैकी पिण्याच्या पाण्याची अधिक चिंताजनक असून पाण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. हातपंपावर महिलांची पाण्यासाठी गर्दी होत असून अनेक हातपंप नादुरूस्त असल्याने चिंता अधिक वाढली आहे.
मागील पाच वर्षापासून कोठारीतील नळयोजना विजेचे बिल थकीत असल्याने व तांत्रीक बिघाडामुळे बंद आहे. मात्र ज्यांच्या खाद्यांवर गावाच्या विकासाची व समस्या निस्तारण्याची धुरा दिली आहे ते सर्व या विषयावर गप्प का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
सध्या गावात ६० हातपंप व चार विहीरी आहेत. त्यापैकी १० ते १५ हातपंप नादूरूस्त असून दोन विहीरीचे पाणी वापरण्या योग्य नाही. उर्वरीत हातपंपाचे पाणीही योग्य नाही. अनेक हातपंपाचे पाणी फ्लोराईडयुक्त आहे. मात्र जगण्यासाठी पाण्याची गरज असल्याने व दुसरा कोणताही पर्याय नसल्याने गावकऱ्यांना त्या पाण्याचा वापर नाईलाजास्तव करावा लागत आहे.
गावात १९८४ मध्ये नळयोजना अस्तित्वात आली. काही वर्ष नळयोजना सुरळीत सुरू होती. मात्र मागील पाच वर्षापासून नळयोजनेच्या विजेचे बिल ग्रामपंचायत भरण्यास असमर्थता दर्शविल्याने नळयोजना ठप्प आहे. कोठारी नाल्यावरील नळयोजनेच्या विहीरी, बाजारातील विंधन विहीर तसेच ग्रामपंचायत समोर असलेल्या विंधन विहीरीत मोटर अडकून पडल्याने त्यातूनही पाणी घेणे शक्य नाही. परिणामी गावकऱ्यांना पाण्याच्या झळा मागील पाच वर्षापासून सोसाव्या लागत आहेत.
गावात तीव्र पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी हातपंपाची व्यवस्था करण्यात आली. मागील वर्षी तीन लक्ष रुपयाचे तीन हातपंप वार्ड नं. १ व वार्ड नं. ५ मध्ये मंजुर करण्यात आले. मात्र सदर हातपंपाचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केल्याने हातपंपाचा गावकऱ्यांना तीळमात्र फायदा झालेला नाही. सध्या तिनही हातपंप बंद असून या वार्डातील जनता पाण्यासाठी भटकत आहेत.
सौर ऊर्जेवरील पंप बंद
गावात वार्ड नं. ३, ४ व ५ मध्ये सौर ऊर्जेवरील पंपाची सुरूवात करण्यात आली. त्यासाठी भरपूर निधी खर्च करण्यात आला आहे. पंपामुळे पाणी समस्या सुटणार म्हणून महिलांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र अल्पवधीतच सदर पंपात बिघाड झाला. आनंदनगर येथील सौर ऊर्जेवरील पंप पाच महिन्यापासून बंद आहे. सदर पंप दुरूस्त करण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीकडे तगादा लावला. मात्र पाषाण हृदयी ग्रामपंचायत प्रशासनाला पाझर फुटला नाही. त्या पंपाच्या अनेक तांत्रीक अडचणी सांगून त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आज तो पंप बंद स्थितीत आहे. वॉर्डातील नागरिकांना एका विहीरीशिवाय दुसरा पर्याय नाही.
नवीन नळयोजनेचे काम सुरू
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी महत्त्वाचे गाव आहे. या गावातून मागील निवडणुकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांना भरपूर मताधिक्य मिळाले. गावात निर्माण होणाऱ्या समस्या निकाली लागाव्या व गावाचा विकास व्हावा हाच शुद्ध गावकऱ्यांचा हेतू होता. त्याबदल्यात ना. मुनगंटीवारांनी ३.५२ कोटी रुपये खनिज विकास निधीतून पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केले. सध्या त्याचे काम सुरू आहे.
हातपंपावर पहाटेपासूनच महिलांची गर्दी
घरात वापरासाठी व पिण्यासाठी गावात हातपंपाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने भल्या पहाटेपासून हातपंपावर महिलांची गर्दी असते. कोठारी गाव शेतीनिष्ठ असून येथे मजुरांची संख्या जास्त आहे. मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. अशात पाण्याची टंचाई. सकाळी घरातील सर्व कामे करून महिलांना शेतात कामावर जावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी पहाटेपासूनच हातपंपावर गर्दी उसळते. पाण्यासाठी भांडणेही होतात तर काही ठिकाणी हातापायी होण्याचे प्रकारही घडत आहेत.
नळयोजनेचे निकृष्ट बांधकाम
३.५० कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले. त्याचे काम चंद्रपूर येथील कंत्राटदाराकडे देण्यात आले. या योजनेची विहीर वर्धा नदीवर बांधण्यात आली. तर पाण्याच्या टाकीचे काम ग्रामपंचायतीजवळ सुरू आहे. बांधण्यात आलेली विहीर व सुरू असलेल्या टाकीचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून या नळयोजना गावकऱ्यांसाठी भविष्यात दीर्घकाळ टिकणार काय, अशी भीती आहे. या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी व अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. निर्माण होणारे बांधकाम निकृष्ट झाल्यास कोठारीकरांना भविष्यात पाण्यासाठी भटकल्याशिवाय पर्याय उरणार नाही.