चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगाव ठरले मोटारपंपाचे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:45 PM2020-07-06T23:45:00+5:302020-07-06T23:45:01+5:30

नागभीड तालुक्यातील कोटगावचे असेच झाले. येथील शिवारात जवळपास ३०० मोटारपंप असल्याने या गावाची मोटारपंपाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

Kotgaon in Chandrapur district became a motor pump village | चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगाव ठरले मोटारपंपाचे गाव

चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगाव ठरले मोटारपंपाचे गाव

googlenewsNext


घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही काही गावांचे एक वैशिष्ट्य असते. आणि या वैशिष्ट्यांमुळे त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होते. नागभीड तालुक्यातील कोटगावचे असेच झाले. येथील शिवारात जवळपास ३०० मोटारपंप असल्याने या गावाची मोटारपंपाचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आणि या मोटरपंपाच्या पाण्यावरच कोटगावने रोवणीमध्ये आघाडी घेतली आहे.
कोटगाव हे नागभीडपासून सहा किमी अंतरावर आहे. १९५६ साली या गावाचा आदर्श गाव म्हणून शासनाकडून गौरव करण्यात आला होता. या गौरवाकरिता तत्कालीन मंत्री व माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांनी कोटगावला भेट दिली होती. एवढेच नाही तर २०१३ -१४ मध्ये या गावाने ग्रामस्वच्छता अभियान राबवून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते.
अशी पार्श्वभूमी असलेल्या गावातील लोकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने येथील लोकांनी शेतीलाच सर्वस्व मानले आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाला येथील शेतकरी पार कंटाळून गेले होते. यावर मात कशी करायची, या विवंचनेत असताना त्यांना शेतात मोटारपंप हा पर्याय दिसून आला. आणि माजी आमदार बाबुराव भेंडारकर यांच्या शेतात पहिला मोटारपंप लावण्यात आला. यानंतर लगेचच २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप लावण्यात आले.

आता या गावात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप दिसत आहे. काही काही शेतकऱ्यांनी दोन तर काहींनी तीन मोटारपंप लावले आहेत. यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. अनेकांनी नाल्यावरही मोटारपंप लावले आहेत. मोटारपंपांच्या या व्यवस्थेने कोटगावची शेती समृद्ध झाली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण तालुक्यात एकाही गावात रोवणीची हालचाल नसली तरी कोटगावमध्ये धडाक्यात रोवणे सुरू करण्यात आले आहेत. कोटगावची आतापर्यंत २५ ते ३० टक्के रोवणी झाली आहे. यासाठी कोटगावकरांनी १५ ते २० दिवसांपूर्वीच पऱ्हे टाकले व पऱ्हे मोटरपंपाच्या पाण्यावर जगवले होते. त्यामुळेच हे शक्य झाले आहे.

Web Title: Kotgaon in Chandrapur district became a motor pump village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती