कोसंबी चकवासीयांचा मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:16+5:302021-01-16T04:33:16+5:30
कोसंबी गवळीला लागूनच कोसंबी चक हे गाव आहे. या गावाच्या मध्ये फक्त एक रस्ता आहे तरीही कोसंबी चक या ...

कोसंबी चकवासीयांचा मतदानावर बहिष्कार
कोसंबी गवळीला लागूनच कोसंबी चक हे गाव आहे. या गावाच्या मध्ये फक्त एक रस्ता आहे तरीही कोसंबी चक या गावाला नेहमीच ग्रा. पं. निवडणुकीच्यावेळी सहा कि.मी. अंतरावरील पारडी या ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात येते. या गावातील जवळपास १२० मतदारांची सहा कि.मी. अंतरावर असलेल्या पारडी ठवरे या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीत नेहमीच नोंद होते. उल्लेखनीय बाब ही की पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेच मतदार गावातच म्हणजे कोसंबी गवळी येथे मतदान करतात आणि नेमक्या ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी या मतदारांची पारडी ठवरे या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नोंद होते. हे असे १५ ते २० वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे. ग्रा. पं. निवडणुकीच्यावेळी आमची नावे कोसंबी गवळी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत आली पाहिजे म्हणून कोसंबी गवळीवासीयांनी अनेकदा आवाज उठविला आहे. एवढेच नाही तर पारडी ठवरे ग्रा. पं. च्या निवडणुकीवर यापूर्वी बहिष्कारही टाकला. पण त्यांना न्याय मिळाला नाही. न्याय न मिळाल्याने त्यांनी यावेळीही मतदानावर बहिष्कार टाकला.
कोट
मागील १५ वर्षांपासून त्यांचा प्रस्ताव प्रशासनाच्या लालफीतशाहीत अडकला आहे. मी स्वतः अनेकदा ही नावे कोसंबी गवळी ग्रा. पं. च्या यादीत समाविष्ट करण्यात यावी म्हणून पाठपुरावा केला आहे; पण नेहमीच चालढकल करण्यात येत आहे. शेवटी वैतागून मतदार मतदानावर बहिष्कार टाकतात. यावेळीही बहिष्कार टाकला.
- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, नागभीड.