कोरपना तालुक्यात साथीचे थैमान
By Admin | Updated: September 29, 2014 23:03 IST2014-09-29T23:03:46+5:302014-09-29T23:03:46+5:30
सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक

कोरपना तालुक्यात साथीचे थैमान
लखमापूर : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच तालुक्यातील गावागावांत सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. तालुक्यात रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत असतानाच २४ सप्टेंबरला एक रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शासकीय आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या वातावरणात उष्णतेची लाट आहे. परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. अचानक आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस कोसळतो. थोड्याच वेळात लख्ख सूर्यप्रकाश पडून उष्णतेत वाढ होते. ऊन्ह-पावसाचा खेळ सुरू असताना वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विस्कळीत झालेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. अस्वच्छ वातावरण व दूषित पाण्यामुळे तापाच्या साथीत भर पडत आहे.
सर्दी, खोकला, अंग दुखणे यासह रुग्णांना प्रथम ताप येतो. औषधे घेऊनही हा ताप कमी होत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचार करूनही ताप कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच तालुक्यातील आवाळपूर येथील दीपक बापुराव उराडे याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच आंबेडकर वॉर्डातील सात ते आठ रुग्ण चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची भीती पुन्हा वाढली आहे. त्याच्या दीपकच्या मृत्यूपूर्वी त्याला तीन-चार दिवस ताप आल्याची माहिती आहे.
तापाने तालुक्यात थैमान घातले असताना शासकीय आरोग्य यंत्रणा कुंंभकर्णी झोपेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात जाऊन रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारची जागृती करताना दिसत नाही. परिचारिका गावात जात नाही. खेड्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर नियमित टाकले जात नाही. स्वच्छतेबद्दल ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. त्यातच सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कर्मचारी बिधनास्त वावरत आहेत.
सध्या तापाचा जोर एवढा आहे की रुग्ण आजारी पडला, की तो एका दिवसातच मृत्युमुखी पडतो. आवाळपूर येथील दीपक बाबुराव उराडेसह येथील अनेक रुग्ण आजारी पडल्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालजात भरती करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाने एक दिवस उपचार केल्यावर या सर्वांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविले. मात्र त्यांपैकी दीपकचा मृत्यू झाला.
पावसाळा संपत आला तरी जंतू नाशक पावडरची फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात डासांचा प्रकोप आहे. त्यातून साथीचे आजार उद्भवत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातकील ग्रामीण भागात जंतू नाशक पावडरची फरवारणी करण्याची मागणी केली जात आहे.
पूर्वी पावसाळ्यात अशा प्रकारच्या फवारण्या जिल्हा परिषदेमार्फत होत होत्या. मात्र गेल्या काही वर्षात या फवारण्या बंद झाल्या आहे. त्यामुळे अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवत आहेत. (वार्ताहर)