कोरपना न्यायालयाला उद्घाटनाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 23, 2015 01:30 IST2015-05-23T01:30:18+5:302015-05-23T01:30:18+5:30
कोरपना या तालुकास्तरावर दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली.

कोरपना न्यायालयाला उद्घाटनाची प्रतीक्षा
कान्हाळगाव (कोरपना) : कोरपना या तालुकास्तरावर दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु, या इमारतीच्या उद्घाटन कार्याला विलंब होत आहे. परिणामी इमारत शोभेची वास्तू ठरत असून न्यायालय इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त नेमका कधी निघणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
१५ आॅगस्ट १९९२ ला कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. पूर्वीपासून ते आजगायत येथील न्यायालयीन कारभार राजुरा येथुन चालत आहे. जिल्ह्यातील अन्य तालुकास्तरावर न्यायालय इमारती स्थापन होऊन कामकाज सुरू आहे. मात्र कोरपन्यात तालुका अपवाद ठरला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून येथे न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. काम अंतिम टप्प्यात आले असून प्रशासनाने इमारतीच्या लोकार्पणासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.
कोरपना येथे न्यायालय नसल्याने सद्यस्थितीत ४२ कि.मी. अंतरावरील राजुरा येथे जाऊन न्यायालयीन कामे नागरिकांना पार पाडावी लागत आहे. यात वेळ, मानसिक त्रास व आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे.
या न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात झाली तर तालुक्यातील ११३ गावातील नागरिकांना सोईचे होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून न्यायालयाचा उद्घाटनाचा मुहुर्त लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी. (वार्ताहर)