चंद्रपूरकरांवर कोपला सूर्य

By Admin | Updated: May 23, 2017 00:27 IST2017-05-23T00:27:41+5:302017-05-23T00:27:41+5:30

मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

Kopala sun on Chandrapurkar | चंद्रपूरकरांवर कोपला सूर्य

चंद्रपूरकरांवर कोपला सूर्य

पारा ४६.८ अंशपार : तापमानात सातत्याने वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी ४६.८ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. संपूर्ण राज्यभरातील हे यंदाचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. दरम्यान, आज सोमवारी ४६.६ अंश सेल्सीअस तापमान होते. सूर्याची ही आग असह्य होत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे.
चंद्रपूरचा उन्हाळा आपल्या उष्णतेमुळे राज्यात कुप्रसिध्द आहे. दरवर्षी राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातच नोंदविले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक अत्यावश्यक काम असल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात फिरकत नाही.
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. जिल्हाभरातील जलसाठ्यात बऱ्यापैकी पाणी जमा झाले. याशिवाय पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही थंडी चांगलीच पडली. काही दिवस तर थंडीने चंद्रपूरकरांना गारठवून टाकले होते. दोन्ही ऋतुने आपले गुणधर्म व्यवस्थित दाखविल्याने यंदाचा उन्हाळाही चांगलाच तापणार, असे भाकित वर्तविण्यात आले होते. प्रारंभी हे भाकित खोटे ठरणार काय, असे वाटत होते. याला कारणही तसेच होते. एरवी होळीच्या पूर्वीच चंद्रपुरात उन्हाचे चटके बसू लागतात. मात्र यावेळी मार्च महिन्यातही गारवा होता. होळी आली तरी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत नव्हते. मात्र होळी व धूळवड लोटल्यानंतर तापमानात वाढ होऊ लागली.
एप्रिल महिन्यात सुर्याने आपले खरे रुप दाखविणे सुरू केले. एप्रिलच्या पंधरवाड्यातच चंद्रपूरचे तापमान ४५ अंशापार गेले होते. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता तापमानाने उच्चांकच गाठला होता. याच महिन्यात अखेरच्या आठवड्यात पारा ४६ अंशा पार गेला. चंद्रपूरवासीयांना मे महिन्यात ‘मे हीट’चा अनुभव दरवर्षी येतो. यादरम्यान, चंद्रपूरच्या गल्लीबोळात अघोषित संचारबंदी लागूू असल्याचा भास निर्माण होतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात चंद्रपूरकरांना ‘मे हीट’चा सामना करावा लागला. एप्रिल महिन्यात सकाळी ९ वाजतानंतर उन्हाचे चटके असह्य होऊ लागले होते. आता मे महिन्यात तर सूर्य आग ओकत आहे. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळला तर दररोज चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक असल्याची नोंद होत आहे. रविवारी आजवरच्या तापमानाने उच्चांक गाठला. आतापर्यंतचे सर्वाधिक ४६.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. पुन्हा आज सोमवारी ४६.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. आज कमीतकमी तापमान २७.६ नोंदविण्यात आले. आणखी काही दिवस तापमान असेच वाढते राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून मिळाले आहेत.

वाढते प्रदूषण कारणीभूत
चंद्रपूरच्या तापमान अधिक असल्याचे अनेक कारणे आहेत. चंद्रपूरला लागूनच कोळसा खाणी, स्टील प्लांट, महाऔष्णिक वीज केंद्र, आयुध निर्माणी कारखाना आहे. या कारखान्यामुळेही तापमान वाढत असते. याशिवाय उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. चंद्रपूरच्या वाढत्या तापमानाला ही बाबही कारणीभूत आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखानदारी असतानाही त्या तुलनेत येथे वृक्ष लागवड होत नाही. कागदोपत्री दाखविण्यात येत असली तर प्रत्यक्षात दिसत नाही. यामुळेही तापमान वाढत आहे.

दुपारी रस्ते ओस
तापमानाने उच्चांक गाठला आहे. सकाळी १० वाजतानंतरच उन्ह असह्य होत आहे. त्यामुळे नागरिक दुपारी १ वाजतानंतर बाहेर पडताना दिसून येत नाही. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक बाहेर पडत नाही. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. सायंकाळीही वातावरणात उष्णता जाणवत असल्याने रात्री ८ वाजतानंतरच बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

Web Title: Kopala sun on Chandrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.