बिबट्याच्या हल्ल्यात २१ शेळ्या ठार
By Admin | Updated: October 12, 2015 01:22 IST2015-10-12T01:22:27+5:302015-10-12T01:22:27+5:30
सादागड बिटाअंतर्गत येत असलेल्या खेडी गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून २१ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात २१ शेळ्या ठार
सावली : सादागड बिटाअंतर्गत येत असलेल्या खेडी गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून २१ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे.
सावली तालुक्यापासून दोन किमी अंतरावर खेडीगाव आहे. मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून रात्री २१ शेळ्या ठार केल्या. सुखरू बका कंकलवार असे शेळी मालकाचे नाव आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले कंकलवार हे वामन पिकलवार यांच्या गोठ्यात शेळ्या बांधून ठेवत असतात. नेहमीप्रमाणे सकाळी दूध काढण्यासाठी गेले असता सर्व शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
त्याच रात्री १२ वाजता दरम्यान बंडू पोचू मारेवार यांच्या घरी बिबट्याने हल्ला चढविला. परंतु ते जागेच असल्याने बिबट्याने पळ काढला. खेडी व भवराळा लागून आसोलामेंढा कालवा आहे. काही अंतरावर त्याच बाजुला नहराजवळ १०८ जागेवर सुबाभुळचे खासगी वन आहे. हे वन घनदाट असून वन्यप्राण्यांना लपून बसण्याकरिता जागा आहे. दिवसा ढवळ्याही येथून प्रवास करताना बिबट कधी हल्ला चढविल याचा काही नेम नाही. दिवसभर या ठिकाणी बिबट लपून राहत असून रात्री सुमारास गावा शेजारील पाळीव प्राण्यावर हल्ला चढवित असतो. बिबट सारखे हिस्त्र प्राणी गावात येवू लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या गावात मेंढपाळाची संख्या अधिक आहे. या ठिकाणी कुरमार जातीचे लोक राहतात. त्याचा पारंपरिक व्यवसाय असल्याने बहुतेकांच्या घरी कमीत कमी खंडीभर शेळ्या असतात. या भरोशावरच कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होत असते. घर संसार चालत असतो.
कंकलवार यांच्या २१ शेळ्या बिबट्याने ठार केल्यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सकाळी या घटनेची माहिती मिळताच गावातीलच विजय कोरेवार यांनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली.
या सर्व शेळ्यांचे शवविच्छेदन डॉ.ए.व्ही. हगवणे व सहकारी पशुवैद्यकीय अधिकारी पी.डी. जुमनाके यांनी केले. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड, क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे सावली, क्षेत्र सहाय्यक आर.जी.कोडापे, व्याहाड, क्षेत्र सहायक बी.पी. रामटेके, पाथरी, क्षेत्र सहायक एस.डी.येल्लेवाड राजोली, तसेच बिटाअंतर्गत येणारे वनरक्षक विश्वास चौधरी व सर्व वनकर्मचारी उपस्थित होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)