दोन गटातील रस्सीखेच बाजूला सारून खेमजईची निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:43+5:302021-01-01T04:19:43+5:30
वरोरा : तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खेमजई येथील नागिरकांनी दोन गटातील राजकारण बाजूला सारले. भांडण, तंटे गावातून हद्दपार करीत ...

दोन गटातील रस्सीखेच बाजूला सारून खेमजईची निवडणूक अविरोध
वरोरा : तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खेमजई येथील नागिरकांनी दोन गटातील राजकारण बाजूला सारले. भांडण, तंटे गावातून हद्दपार करीत गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध करून नवा आदर्श अन्य गावकऱ्यांपुढे ठेवला आहे.
गावकऱ्यांच्या या निर्णयाने गावात आनंदाचे वातावरण आहे. उलट यामुळे पैशाची उधळपट्टी टाळली. सरपंच पदासाठीच्या घोडेबाजारालाही आळा बसणार आहे. खेमजई हे गाव तालुक्यात राजकारण तसेच समाजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. या गावात सर्व जाती-धर्मांचे लोक वास्तव्यास आहे. विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन गटांमध्ये नेहमीच रस्सीखेच बघायला मिळायची. या सर्व बाबींना ग्रामस्थांनी फाटा देत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. खेमजई ग्रामपंचायत नऊ सदस्यांची आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व सहमतीने नऊ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र २९ डिसेंबरला तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चंद्रहास मोरे, रमेश चौधरी, शैला चवरे, भाऊराव दडमल, माधुरी निब्रड, वंदना नन्नावरे, धनराज गायकवाड, शीतल साळवे, मनीषा चौधरी यांची अविरोध निवड झाली आहे. सरपंचसुध्दा अविरोध निवडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कन्हैयालाल जैस्वाल, डॉ. गांपावर साहेब, अरविंद पेटकर, भगवंत नन्नावरे, अशोक दडमल, विनायक बावणे, रवींद्र रणदिवे, अनिल साळवे, विजय निब्रड, विलास चौधरी, कमलाकर कापटे यांनी एकीने हे घडवून आणले. सर्व स्तरातून खेमजई ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.