खंजेरीने चेतविले स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग..!

By Admin | Updated: August 15, 2016 00:34 IST2016-08-15T00:34:01+5:302016-08-15T00:34:01+5:30

इंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता.

Khasarii sparkling conscious freedom ..! | खंजेरीने चेतविले स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग..!

खंजेरीने चेतविले स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग..!

ब्रिटिशांचा राष्ट्रसंतांना प्रतिबंध : दोन वर्षे नऊ महिने होती जिल्हाबंदी
राजकुमार चुनारकर चिमूर
इंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता. गांधीजीच्या या नाऱ्यामुळे पूर्ण भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध जनआक्रोश उफाळलेला होता. त्याच सुमारास चिमूर परिसरात वास्तव्यास असलेल्या राष्ट्रसंताच्या खंजेरीच्या खणखणटाने प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग चेतविले. राष्ट्रसंतांच्या भजनाने प्रेरीत होवून चिमूर येथील क्रांतीकारकानी इंग्रजी सत्ता उलथवून लावण्यासाठी जनआंदोलन उभारले. या आंदोलनामध्ये १६ आॅगस्ट १९४२ ला अनेक इंग्रज जुलमी अधिकाऱ्याचे मुडदे पाडून चिमूरला सलग तीन दिवस इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले होते. ही सर्व क्रांती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीच्या खणखणाटात व भजनाच्या प्रेरणेने आल्याचा ठपका राष्ट्रसंतावर ठेवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना चांदा जिल्हा प्रवेशावर बंदी घातली होती.
‘जाग उठो बालविरों, अब तुम्हारी बारी है.... झाड झडुले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे...’ या खंजेरीच्या खणखणाटासह क्रांतिकारी भजनाने चिमूरातील युवकामध्ये इंग्रज सत्तेविरूद्ध रणशिंग फुंकले होते. याच भजनाने प्रेरित होऊन १६ आॅगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी गावात प्रभातफेरी काढली. या प्रभात फेरीविरूद्ध इंग्रजांनी संचार बंदी लागू केली. मात्र संचार बंदीला न जुमानता क्रांतीकारकांनी जुलमी इंग्रज अधिकारी जरासंध, एसडीओ डुगाजी व इंग्रज अधिकारी सोनवाने यांचा वध करून चिमूरच्या पोलीस ठाण्यात ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा फडकाविला. चिमूरकरांनी सलग १६, १७ व १८ आॅगस्ट असे तीन दिवस देशात प्रथम स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिन रेडिओवरून सुभाषचंद्र बोस यांनी केली होती.१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना कारणीभूत ठरवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंतांना २८ आॅगस्टच्या पहाटे बाबुपेठ, चंद्रपूर येथील चार्तुमास शिबिरात असतांना डी.सी. सुब्रम्हण्यम् व डी.एस.पी. सर्कल इन्स्पेक्टर शर्मा यांनी राष्ट्रसंतांना अटक केली होती. राष्ट्रसंतांना चंद्रपूरच्या जेलमध्ये ठेवल्यास गडबड होऊ शकते म्हणून ब्रिटिशांनी राष्ट्रसंतांना नागपूरच्या सेन्ट्रल जेलमध्ये नेण्यात आले. तिथून त्यांना रायपूरला हलविण्यात आले. रायपूरच्या कारागृहामध्ये राष्ट्रसंतांना रूम क्रमांक ४९७ वर्ग १ मध्ये बंदिस्त करण्यात आले होते. महाराजांच्या सुटकेसाठी क्रांतिवीराची खटपट सुरू झाली होती. जनतेची मागणी तथा महाराजांचे धार्मिक कार्य व शुध्दता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी २ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्रसंताची कारागृहातून सुटका केली.
चिमूर क्रांती लढ्यासाठी महाराजांनी चिमूर तालुक्यातील गावागावात युवकांना जागवून तलवार, लाठीकाठीचे प्रशिक्षण देवून जागृती केली. तसेच क्रांतीकारी भजनाने व खंजेरीच्या खणखणाटाने चिमूर नगरीत क्रांती झाली होती. चिमूरची क्रांती आजही देशात अजरामर आहे. या क्रांतीसाठी कारणीभूत ठरवून इंग्रज सरकारने राष्ट्रसंतांना चंद्रपूर जिल्हा बंदी केली होती.
ही जिल्हा बंदी २ वर्षे ९ महिने ठेवण्यात आली होती. आजही चिमूर परिसराला राष्ट्रसंताची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते. तर प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या जयघोषाशिवाय पूर्ण होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजही चिमूरकरांच्या हृदयामध्ये वास करीत आहे. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीतील राष्ट्रसंताच्या योगदानाची कल्पना येते.

Web Title: Khasarii sparkling conscious freedom ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.