४ लाख ६० हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी
By Admin | Updated: April 22, 2016 02:50 IST2016-04-22T02:50:47+5:302016-04-22T02:50:47+5:30
कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप

४ लाख ६० हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी
चंद्रपूर : कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप हंगामाचे नियोजन गांभीर्यपूर्वक करून शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी कोणत्याही अडचणी जाणार नाही, याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, काळा बाजार रोखावा व सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी कृषी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे गुरूवारी खरीप हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ.शोभाताई फडणवीस, आ. नाना श्यामकुळे, आ. सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व जि. प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी संबंधी विविध योजना व खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. योजना राबवित असताना किंवा कामाचे नियोजन करीत असताना काही अडचण आल्यास ते लेखी स्वरुपात कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यानी यावेळी दिल्या. यावर्षी पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून हा खरीप सुगीचा जाईल, असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. शेतकरी स्वाभिमान वर्ष राबवित असताना शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशा प्रकारे खरीपाचे नियोजन असावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत कृषी विषयी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे संचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे यांनी केले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मागेल त्याला विहिर द्या
४पेरणीचे नियोजन, बँकनिहाय कर्ज वाटप, कर्ज पुर्नगठन, राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रलंबित कृषी पंपाच्या जोडण्या, बियाणांची उपलब्धता, खते किटकनाशके आदी विषयाचा या बैठकीत पालकमंत्र्यानी आढावा घेतला. मागेल त्याला विहीर या अंतर्गत जिल्ह्यात ५ हजार विहिरीचा लक्षांक ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
२ हजार ६११ मेट्रीक टन खत उपलब्ध
४जिल्ह्यास विविध पिकांकरिता एकूण ८६ हजार ३८२ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरिता १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आंवटन असून २६११ मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. यातून २०० मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे. तर २४११ मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
असे आहे खरीप
पेरणीचे नियोजन
४सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामाकरिता ४ लाख ६० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात १ लाख ७२ हजार, सोयाबिन ८० हजार हेक्टर असे नियोजन आहे.