खरीप हंगामाचे अनुदान परत जाणार
By Admin | Updated: February 25, 2015 01:21 IST2015-02-25T01:21:04+5:302015-02-25T01:21:04+5:30
चालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.

खरीप हंगामाचे अनुदान परत जाणार
प्रवीण खिरटकर वरोरा
चालू वर्षातील खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. अनुदानाचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक अद्याप दिले नाही, अशा शेतकऱ्यांचे अनुदान ७ मार्चनंतर परत जाणार आहे. त्यामुळे बँक खाते नसलेले अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
चालू वर्षातील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दुबारा, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच सोयाबीन पिकाने बहुतांश शेतकऱ्यांना धोकाही दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली. त्यानंतर शासनाने प्रति हेक्टर ४५०० रुपये अनुदान जाहीर केले. महसूल विभागामार्फत मागील काही महिन्यापासून अनुदान वाटप सुरू आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महसूल विभागाने बँक खाते अनिवार्य केले आहे.
एकाच सातबारावर एका पेक्षा अधिक नावे असल्यास संमतीपत्र, मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आदी दस्ताऐवज अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. बहुतांश तालुक्यासाठी १४ ते २० कोटी पर्यंतचे अनुदान आले असून शेतकऱ्यांची संख्या प्रत्येक तालुक्यात ३० हजारापेक्षा अधिक आहे. महसूल विभागाने अनुदानाबाबत जनजागृती केली. मात्र, आजतागत केवळ ५० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे.
उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते तलाठ्याकडे सादर केली नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खाते सादर करण्याकरीता शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी खाते क्रमांक सादर केले नाही. त्यामुळे ७ मार्चनंतर अनुदानाची शिल्लक राशी शासनाकडे परत जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)