केरला एक्स्प्रेसचा चंद्रपुरात थांबा मंजूर
By Admin | Updated: November 20, 2015 00:27 IST2015-11-20T00:27:24+5:302015-11-20T00:27:24+5:30
जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे बहुप्रतीक्षित स्वप्न केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहे.

केरला एक्स्प्रेसचा चंद्रपुरात थांबा मंजूर
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे बहुप्रतीक्षित स्वप्न केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहे. त्रिवेंद्रम- नवी दिल्ली- केरला या दैनिक गाडीचा थांबा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर मंजूर करण्यात ना. अहीर यांना यश आले आहे. २३ नोव्हेंबरपासून ही रेल्वेगाडी चंद्रपूर स्थानकावर थांबणार आहे. या एक्स्प्रेसचा लाभ जिल्ह्यातील हजारो प्रवासी होणार असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील काही वर्षांपासून केरला एक्स्प्रेसचा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समिती, कोयला, श्रमिक संघ तसेच विविध सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे करण्यात येत होती. या मागणीस अनुसरुन त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
१८ मार्च २०१५ रोजी ना. अहीर यांच्या नेतृत्वात या मागणीला घेऊन चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ना. अहीर यांनी केरला एक्स्प्रेसचा थांबा या औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जिल्ह्याकरिता किती महत्वपूर्ण आहे, ही बाब पटवून दिली होती. या भेटीत मंत्र्यांनी या गाडीचा थांबा देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर लगेच चंद्रपुरात थांबा मंजूर केल्याचे पत्रही राज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिले.
२३ नोव्हेंबर रोजी केरला एक्स्प्रेस (१२६२५/ १२६२६) पहिल्यांदा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबणार असून या थांब्यामुळे जिल्ह्यातील सर्वच घटकातील प्रवाशांना मोठी सुविधा ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली आहे. या गाडीमुळे आता तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना थेट सुविधा उपलब्ध होणार आहे.
वर्धेहून पुण्याला जाण्याकरिता गरीब रथ तसेच पुणा एक्स्प्रेस पकडण्याची तसेच या एक्स्प्रेसने नागपूरला जाऊन मुंबईकरिता दुरांतो एक्स्प्रेस पकडण्याची सोय होणार आहे. केरला एक्स्प्रेस ही चंद्रपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास पोहोचणार असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)