केवाडावासीयांनी सुरू केले स्वच्छता अभियान
By Admin | Updated: February 2, 2016 01:16 IST2016-02-02T01:16:26+5:302016-02-02T01:16:26+5:30
चिमूर पंचायत समिती अंतर्गत केवाडा (पेठ) येथील गावात व ताडोबा तथा तपोभूमीच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते.

केवाडावासीयांनी सुरू केले स्वच्छता अभियान
शौचालयाचा वापर सुरू : दर मंगळवारी राबविणार मोहीम
पेंढरी (कोके) : चिमूर पंचायत समिती अंतर्गत केवाडा (पेठ) येथील गावात व ताडोबा तथा तपोभूमीच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ‘लोकमत’ने १७ जानेवारीला ‘पर्यटकांच्या मार्गावरील गावात अस्वच्छतेचे कळस’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच गावकऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली असून शौचालयाचा वापर करणे सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण भारत देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यानुसार देशातील गाव, रेल्वेस्थानक, शहर, नद्या, देवस्थाने, पर्यटन, तीर्थस्थळ मोठ्या जोमाने स्वच्छ केल्या जात आहेत. परंतु चिमूर तालुक्यातील केवाडा (पेठ), लोहारा हे गाव अस्वच्छतेच्या विळख्यात होते. सदर गावात शौचालय असूनसुद्धा तेथील जनता शौचालयाचा वापर करीत नसत. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच, येथील कृष्णकांत वसाळे यांनी सरपंच राजेंद्र नैताम, उपसरपंच शशिकला निकोडे, ग्रामसेवक तुषार सहारे व ग्राम पंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, तरुण, शालेय विद्यार्थी, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व श्री हनुमान देवस्थान कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री हनुमान देवस्थानच्या पटांगणात जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
यात प्रा.नीळकंठ लोनबले यांनी स्वच्छता, रोगमुक्ती, वन संगोपन तथा संवर्धन, जागतिक तापमान, पाणी व्यवस्थापन, शौचालयाचा वापर व त्याचे महत्त्व, महिलांचे आरोग्य इत्यादी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर स्थानिक प्रशासन व गावकऱ्यांनी संकल्प करून दररोज गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.
गावातील महिलांनी शौचालयाचा नियमित वापर करणे सुरू केले आहे. तसेच गावातील कोणीही मुख्य रस्त्यावर शौचास बसणार नाही असा संकल्प केला. गावकऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. गोंदेडा यात्रेनिमित्त गावात व मुख्य रस्त्यावर तोरण पताका लावून रस्ते सुशोभित करण्यात आले होते. प्रवेशद्वार द्वार लावून गावाचा चेहरामोहराच बदलविला. मोहीम बारमाही सुरू राहील, असे गावकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)