कवडसीची शाळाच वेगळी !
By Admin | Updated: December 6, 2014 01:18 IST2014-12-06T01:18:42+5:302014-12-06T01:18:42+5:30
जिल्हा परिषदतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत मागे पडत असल्याची ओरड आहे.

कवडसीची शाळाच वेगळी !
साईनाथ कुचनकार चंद्रपूर
जिल्हा परिषदतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत मागे पडत असल्याची ओरड आहे. ही ओरड काही प्रमाणात योग्य असली तरी, आजही काही जिल्हा परिषद शाळांनी आपला दर्जा कायम ठेवला आहे. एवढेच नाही तर, खासगी शाळांना लाजवेल अशा शाळा जिल्ह्यात आहे. केवळ इमारत आणि परिसर स्वच्छताच नाही तर, विद्यार्र्थ्यांची गुणवत्ता आणि आवश्यक असलेले जीवनमुल्येही शिकविल्या जात आहे. आता तर विद्यार्थ्यांनी चक्क गावातील स्वच्छतेचे सर्व्हेक्षणही सुरु केले आहे. पालकांच्या सहभागातून उभ्या असलेल्या या शाळेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशीच चिमूर तालुक्यातील कवडसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वांचे लक्ष वेधत आहे.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घेऊन सध्या ओरड सुरु आहे. यामुळे शासन, प्रशासनही चिंतेत सापडले आहे. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थी टिकविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी अधिकारीही त्याच तत्परतेने कामाला लागले आहे. यात काही प्रमाणात बदल होत आहे. मात्र काही गावांमध्ये ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळा दिमाखात उभ्या आहे. कवडसी येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळा इमारत, रंगरंगोटी केली आहे. एवढेच नाही तर ई-लर्निंगसाठी ग्रामस्थांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपये गोळा करुन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचा पाया अंगणवाडीतून मजबुत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेसोबतच अंगणवाडीच्या विकासातही हातभार लावला आहे. अंगणवाडीत सर्व भौतिक सुविधा, पाण्याची व्यवस्था, शौचालय, मुत्रीघराची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना आलाददायक वातावरण राहावे यासाठी २५ हजार रुपये खर्च करून रंगरंगोटी केली आहे. ज्या पद्धतीने ग्रामस्थ शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे. त्याच प्रमाणात शाळाही गावासाही अनेक उपक्रम राबवित आहे. यामध्ये परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, दर गुरुवारी रामधून व गावस्वच्छता उपक्रमात सक्रीय सहभाग, महिलांसाठी हळदीकुंकू आदी उपक्रम शाळा स्वत:हून राबवित आहे. अंगणवाडीपासून विद्यार्थ्यांचा पाया मजबुत होत आहे. शाळेतील या उपक्रमातून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळत आहे. शाळेच्या जडणघडनीमध्ये ग्रामस्थ सहभाग घेत आहे. यात वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष सुशिला धोटे, सरपंच संभाजी खेकारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर धोटे यांच्यासह मुख्याध्यापक धनराज गेडाम प्रयत्नशिल आहे. यांच्या प्रयत्नातून आज घडीला शाळेत दरमहिन्यात चावडीवाचन, कथाकथन, बुलबुल कब, बालआनंद मेळावा आयोजित करण्यात येत आहे.