कार्तिकी जिल्ह्यात अव्वल
By Admin | Updated: June 4, 2017 00:24 IST2017-06-04T00:24:46+5:302017-06-04T00:24:46+5:30
सीबीएसई बोर्डाच्या शनिवारी आॅनलाईन घोषित झालेल्या दहावीच्या निकालात महर्षी विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

कार्तिकी जिल्ह्यात अव्वल
सीबीएसई दहावीचा निकाल : गुणांची टक्केवारी वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीबीएसई बोर्डाच्या शनिवारी आॅनलाईन घोषित झालेल्या दहावीच्या निकालात महर्षी विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तिने ९९.४ टक्के गुण घेत प्रथम येण्याचा मान मिळविला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी सीबीएसई निकालात गुणांची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.
सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यात जवळपास १२० शाळा आहेत. चंद्रपूर शहरात आठ ते दहा शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवितात. सीबीएसईचा दहावीचा निकाल आज शनिवारी आॅनलाईन घोषित करण्यात आला आणि या शाळांमध्ये सुट्या सुरू असतानाही आज विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून आली. येथील महर्षी विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार हिने ९९.४ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली येण्याचा मान मिळविला.
जिल्ह्यातील सर्वच शाळांनी दिला उत्कृष्ट निकाल
निकाल दहावीचा : बहुतांश विद्यार्थ्यांनी केले ९० टक्के पार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच शाळांनी यंदा सीबीएसई दहावीचा निकाल उत्कृष्ट दिला आहे. जिल्ह्यात पहिली आलेली कार्तिकी देगमवार हिने गणित व विज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. चंद्रपूरच्याच बीजेएम कार्मेल अकादमीची विद्यार्थिनी ईशा राजू घुमे, नारायणा विद्यालयाची मानसी भलमे आणि प्रतिक इंगळे यांना ९९.२ गुण मिळाले आहेत. महर्षी विद्यामंदिरमधील २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकाविले आहेत. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. तर बीजेएम कार्मेल अकादमीच्या चार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. नारायणा विद्यालयाच्या ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकाविले आहेत. येथील नारायणा विद्यालयमनेही १०० टक्के निकाल दिला आहे. येथील ४६ विद्यार्थी १० सीजीपीएमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेऊन यश प्राप्त केले आहे. चंद्रपुरातील विद्या निकेतन शाळेतील १४ विद्यार्थी १० सीजीपीए मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यात ११ विद्यार्थिनींचा समावेश आहे. मॅकरून स्टुडंट अॅकाडमी या विद्यालयातील ६२ विद्यार्थी सीजीपीए-१० मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन शाळेतील सहा विद्यार्थी ९० टक्क्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलमधील दहा विद्यार्थी १० सीजीपीए प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे. एकूणच दहावी सीबीएसई निकालात यंदा गुणांची टक्केवारी मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले.
कार्तिकीला व्हायचय आर्किटेक्चर
शनिवारला घोषित झालेल्या सीबीएसीच्या निकालात विदर्भातून प्रथम आलेल्या कार्तिकीला आर्किटेक्चर व्हायचे आहे. कार्तिकीचे वडिल प्रविण देगमवार हे सिव्हिल इंजिनियर आहेत. तर आई योगिनी देगमवार या प्राध्यापिका आहेत. कार्तिकीला अभ्यासामध्ये तिचे वडील मदत करायचे. कार्तिकी नियमीत ५ ते ६ तास अभ्यास करायची तर परीक्षेच्या कालावधीत ८ ते ९ तास अभ्यास करीत होती. कार्तिकीने अभ्यास करताना पेपर सोडविण्यावर अधिक भर दिला. त्यासोबतच स्वाध्याय पुस्तिकाचे नियमीत वाचन केले. कार्तिकीला पेंटींग, नृत्य करणे, गाणे गाण्याचा छंद आहे. तसेच कार्तिकीला क्रिकेटची आवड असून तिचा आवडता खेळाडू विराट कोहली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवडते राजकीय नेते आहेत. कार्तिकीला शिक्षकांच्या मार्गदर्शनात नियमीत अभ्यास केल्याने यश प्राप्त झाले.