स्वातीसाठी विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च
By Admin | Updated: October 8, 2015 00:37 IST2015-10-08T00:37:25+5:302015-10-08T00:37:25+5:30
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आत्ममहत्या करून जीवन संपविणारी विद्यार्थिनी स्वाती सतीश निकुरे हिच्या समर्थनार्थ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ....

स्वातीसाठी विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च
ब्रह्मपुरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आत्ममहत्या करून जीवन संपविणारी विद्यार्थिनी स्वाती सतीश निकुरे हिच्या समर्थनार्थ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शहरातून शांतमय कॅडल मार्च काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या एकतेमुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान, तीनही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांना गवसलेले नाही.
४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजून ४ मिनिटानी स्वातीने लिहून ठेवलेल्या नोटमध्ये ‘मेश्राम सर, माझ्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला ठेवून बघा, तर तिलाही माझ्यापेक्षा जास्त दु:ख होईल, अशी तुमची भाषा होती. या दु:खामध्ये शाहरुख अली सय्यद व रजत जिभकाटे हे तेवढेच कारणीभूत आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात असे बोललेले मी कधी ऐकलेले नाही. त्यामुळे मला ते सहन होत नाही. कॉलेजमध्ये जाण्याची हिंमत माझ्यामध्ये राहिलीच नाही. सॉरी आई बाबा मी तुमचे स्वप्न साकार करु शकत नाही. तुमचीच (नमू) स्वाती निकुरे’ असा उल्लेख आहे.
या संपूर्ण वाक्यामध्ये गांभीर्य दडलेले असल्याने विद्यार्थी वर्ग पेटून उठला आहे. प्राध्यापकाविषयी प्रचंड चिड केवळ स्वातीच्या मनातच खदखदत नव्हती तर सबंध विद्यार्थ्यांत ती खदखदत असल्याने विद्यार्थ्यांनी मृतदेह उचलण्यास केलेला मज्जाव, अंत्यविधीसाठी १२५ कि.मी पर्यंत जाण्याची विद्यार्थ्यांनी केलेली धडपड व मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी काढलेला मूक कॅडल मार्च आदी भूमिकेवरुन या प्रकरणाची तीव्रता दिसून येत आहे.
मात्र घटनेला दोन दिवस लोटूनही तिन्ही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीचे सुजाण पालक या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. म्हणजे हे प्रकरण केवळ तिघांवर अवलंबून नसून यात अनेकांचे प्रत्यक्ष संबंध असले पाहिजे, असे मत व प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी हे प्रकरण निपक्षपाताने हाताळून विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आरोपींना कुठलेही अभय न देता हातळावे अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
अटकपूर्व जामीनसाठी आरोपींचा अर्ज
दोन दिवस लोटूनही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही. त्यांचा अद्याप थांगपत्ता नसला तरी आरोपींच्या वकिलाने बुधवारी चंद्रपूरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरूवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.