कलामांच्या जाण्याने दाटला आठवणींचा गहिवर...!
By Admin | Updated: July 29, 2015 00:53 IST2015-07-29T00:53:42+5:302015-07-29T00:53:42+5:30
आपल्या असामान्य कर्तृत्वाने मनामनात घर करणारे देशाचे माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले ...

कलामांच्या जाण्याने दाटला आठवणींचा गहिवर...!
चंद्रपूर: आपल्या असामान्य कर्तृत्वाने मनामनात घर करणारे देशाचे माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले अन् त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांच्या आठवणींचा गहिवर दाटून आला. त्याला कारणही तसेच आहे. एक वर्षापूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारी २०१४ रोजी अवघ्या देशाचे लाडके ‘कलाम चाचा’ चंद्रपुरात आले होते. चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित दोन तासांच्या कार्यक्रमातून चंद्रपुरकारांनी त्यांना अगदी जवळून ऐकले, अनुभवले होते...!
मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि खासदार हंसराज अहीर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समर्थ भारत-२०२०’ अंतर्गत डॉ. अब्दूल कलाम येथे आले होते. स्थानिक चांदा क्लब ग्राऊंडवर त्यांना पाहण्या आणि ऐकण्यासाठी तुडूंब गर्दी जमली होती. त्यांच्या स्वागतासाठी आतुरलेली गर्दी त्यांचे आगमन होताच, प्रचंड हरखून गेली होती. या कार्यक्रमात कलाम चाचांनी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अस्वस्थ करणारी आणि झोप न येणारी स्वप्न बघा. आपल्या क्षमता जागवा आणि धैर्यान जगा. कारण आपला जन्म रांगण्यासाठी नव्हे तर उंच भरारी घेऊन उडण्यासाठी झाला आहे, हे लक्षात असू द्या, असा संदेश कलाम चाचांनी यावेळी हजारो विद्यार्थ्यांना दिला होता. डॉ.अब्दूल कलामांना प्रत्यक्ष पाहू, ऐकू असे कदाचित चंद्रपूरकरांच्या कधी गावीही नसेल. पण १४ फेब्रुवारीला हा योग जुळून आला आणि चंद्रपूरकरांना मनाचे कान करून कलाम चाचांना ऐकता आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतले.
माणूस समस्येपुढे कधीच पराभूत झाला नाही. नेहमी जिंकल्याचाच इतिहास आहे. त्यातूनच अश्यक्यप्राय गोष्टी शास्त्रज्ञांनी साध्य केल्या. ही सिद्धता त्यांनी मनाच्या सक्षमतेवर आणि तीव्र इच्छाशक्तीवर मिळविली. त्यांनी जग बदलण्याची शक्ती बाळगली. ती तुम्हीही बाळगा, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
जगातील अविश्वास, भ्रष्टाचार, हिंसा, भीती, द्वेषभावना दूर करण्यासाठी आत्मशक्ती जागविण्याचा संदेश त्यांनी दिला. नेहमी आपलाच जय होणार असाच विचार मनात ठेवा. आत्मविश्वासाने निर्भयता येते. त्या बळावर पुढे चालत राहा. प्रत्येकातच काहीतरी वैशिष्ठ्य दडलेले असते, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. डॉ.कलामांचे भाषण आजही अनेकांना जसेच्या तसे आठवते. इतके ते अविस्मरणीय होते. कलामचाचांचे एकूणच व्यक्तिमत्व भारदस्त होते. साधी राहणी, ऋषीतुल्य जीवन यामुळे ते युवकांसाठी आदर्श होते. त्यांचे विचार कायम सर्वांसाठी प्रेरणादायी राहणार असल्याच्या प्रतिक्रीया येथे व्यक्त झाल्या.
सोमवारी रात्री कलाम चाचांच्या निधनाची बातमी वृत्त वाहिन्यांवरून झळकली अन् ज्यांनी-ज्यांनी त्यांना जवळून पाहिले, ऐकले त्या साऱ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. विविध सामाजिक, राजकीय संघटना, शैक्षणिक संस्थांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)
शोकसंवेदना
भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी डीआरडीओच्या माध्यमाने अग्नी क्षेपणास्त्रामुळे ज्यांची मिसाईल मॅन अशी ओळख निर्माण झाली, ते असामान्य विज्ञानवादी डॉ.एपीजे अब्दूल कलाम यांचे अकस्मात निधन मनाला चटका लावून गेले. भारताचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी २०२० पर्यंत भारत जागतिक महासत्ताक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी ते देशभर भ्रमण करीत होते. त्यांच्या जाण्याने एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआडा गेले आहे.
-हंसराज अहीर
केंद्रीय राज्य मंत्री
माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दूल कलाम यांच्या निधनाने केवळ देशाचीच हानी झाली नाही तर खऱ्या अर्थानं वैज्ञानिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते एक सच्चे देशप्रेमी होते. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांचे विचार अनुकरणीय होते. ते आत्मसात केल्यास देशाची निश्चितपणे प्रगती होणार आहे. आणि तेच खऱ्या अर्थानं डॉ.अब्दूल कलाम यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
-प्राचार्य जे.ए.शेख
सरदार पटेल महाविद्यालय.
डॉ.एपीजे अब्दूल कलाम अर्थात युवकांचे लाडके कलाम चाचा हे अवकाश क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक होते. त्यांनी स्वदेशी अग्निबाण तयार करून भारताचे नाव उंचावले. सन २०२० पर्यंत भारताला अग्रगण्य देश करण्याचे केवळ त्यांनी स्वप्न पाहिले नाही, तर त्यासाठी ते देशभर फिरत राहीले. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करीत राहीले आणि ते करतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे विचार आणि कृती हे देशाला प्रगतीपथावर नेणारी होती. युवकांसाठी ते आदर्श होते. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले.
-प्रा.सुरेश चोपणे, चंद्रपूर
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दूल कलाम हे युवकांचे प्रेरणास्त्रोत होते. स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करून देशाला एक प्रकारे त्यांनी बळ प्राप्त करून देणे. या देशात खूप शास्त्रज्ञ होऊन गेलेत. मात्र डॉ.कलाम यांचे कार्य देशाच्या कायम स्मरणात राहणार आहे. ते खऱ्या अर्थानं युवकांसाठी आयकॉन होते. एवढेच नव्हे तर ते एक महान शिक्षक होते. सच्चे देशभक्त होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांच्या जाण्याने या देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
-प्रा.चंद्रकांत टोंगे, चंद्रपूर