भद्रावती येथील प्लॉटधारकांना न्याय
By Admin | Updated: May 12, 2016 01:05 IST2016-05-12T01:05:50+5:302016-05-12T01:05:50+5:30
गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे.

भद्रावती येथील प्लॉटधारकांना न्याय
आखीव पत्रिका मिळणार : ४७ वर्षांपासून सुरू होता संघर्ष
भद्रावती : गेल्या ४७ वर्षांपासून संबंधित प्लॉटसाठी लढा देणाऱ्या भद्रावती येथील ५५ प्लॉटधारकांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुमारे ४७ वर्षांपूर्वी बेघर व्यक्तींना सरकारने त्या काळात असलेल्या जागेच्या भावानुसार रक्कम आकारुन भूमीस्वामी हक्काने प्लॉट वाटप करुन पट्टे दिले होते. त्यात प्लॉट १० वर्षांपर्यंत विकता येणार नाही व एक वर्षांच्या आत घर बांधून वहिवाट करावी, या दोन अटी टाकण्यात आल्या होत्या. त्या अटींचे प्लॉटधारकांनी काटेकोरपणे पालनही केले.
या भूखंडात एकूण ५५ प्लॉटधारक आहेत. परंतु या प्लॉटधारकांची पटवारी रेकॉर्ड, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय, नगर परिषद, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद नव्हती. त्यामुळे अनेकदा लिखापढीे करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. मालकी हक्क नसल्यामुळे शासकीय योजनेपासून तसेच बँकेच्या तारण योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागले. शोधाशोध करतानाच सदर भूखंड कै. माधव पाटील यांच्या नावे असल्याचा पुरावा मिळाला. याच भूखंडावर गावठाण होते. काही काळाने हे गावठाण उठून पडीत असलेली जागा शासनाने आपल्या ताब्यात घेवून त्यावेळच्या ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीमुळे त्याचे प्लॉट पाडले. ५५ प्लॉट गरजूंना जुजबी मोबदला घेवून व काहींकडून १०० रुपयांचे राष्ट्रीय बचत रोखे काढून वाटप केले. परंतु संबंधित कोणत्याही याबाबत कार्यालयात नोंद केली नाही. त्यामुळे या भूखंडावर रहात असलेले रहिवाशी संघटित होवून आपल्या मालकी हक्कासाठी लढू लागले. या भूखंडास आज शिवाजीनगर असे संबोधले जाते. येथील सर्व रहिवाशांनी एकत्र येवून संघर्ष समितीची स्थापना केली. २६ डिसेंबर २०१४ ला तालुका कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भद्रावतीच्या नावे आखिव पत्रिका देण्यासंबंधीचे पत्र नजरेस पडले. त्याचीच प्रेरणा घेऊन संबंधित प्लॉटधारकांनी पाठपुरावा केला. ४७ वर्षानंतर प्लॉटधारकांना आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.