प्रचारासाठी अवघे तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:53+5:302021-01-13T05:11:53+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहचला आहे. अवघे तीनच ...

प्रचारासाठी अवघे तीन दिवस
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहचला आहे. अवघे तीनच दिवस उमेदवारांना प्रचारासाठी असल्यामुळे दिवस-रात्र एक करीत प्रचार केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून मतदारांचे मोबाईल हँग होत आहेत.
१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे शिल्लक असलेल्या वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तरुण उमेदवारांची फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा पुरेपूर वापर ते करताना दिसत आहे. मोबाईलमध्ये विविध ॲपच्या सहाय्याने मराठी, हिंदी गाणे टाकून छोटे-छोटे व्हिडिओ क्लीप तयार करीत असून, ते उमेदवारांपर्यंत पोहचविल्या जात आहे. त्यातच अनेकांनी ग्रुपही तयार केले आहेत. या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर केल्या जात असल्यामुळे अनेकांचे मोबाईल हँग होत आहेत.
काही उमेदवारांनी तर चित्रपटातील कलाकारांचे व्हिडिओ एडिट करून आपल्या निवडणूक प्रचारात वापर करीत आहे. गावातील निवडणूक असतानाही सोशल मीडियामुळे प्रचार हायटेक होत आहे.
बाॅक्स
कुठे ७ तर कुठे १७ सदस्य
जिल्ह्यातील विसापूर, माजरी, शंकरपूर तसेच अन्य काही मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली असून, आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे येथे नगर परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, येथे प्रशासकीय नियुक्तीही करण्यात आली आहे.
-
बाहेरगावातील मतदारांकडे उमेदवारांचे लक्ष
गावातील काही नागरिक कामानिमित्त अन्य शहरात तसेच गावात गेले आहेत. या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे कामही उमेदवार करीत आहे. काहींना तर वाहन पाठविण्याचे आश्वासन दिल्या जात आहे. विशेष म्हणजे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून नंबर घेऊन त्यांच्यापर्यंत संपर्क करून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत.