कोविड योद्ध्यांना नुसताच मान; तीन महिन्यांचे मानधन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:40+5:302021-07-09T04:18:40+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र, आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागाची मोठी ...

कोविड योद्ध्यांना नुसताच मान; तीन महिन्यांचे मानधन थकीत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र, आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागाची मोठी दमछाक होत होती. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, सिक्युरिटी गार्ड यांची नियुक्ती करण्यात आली. अल्प मानधन देण्यात येत असले तरी राष्ट्रहिताचे काम म्हणून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवा बजावत आहेत; परंतु काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे तर काही कर्मचाऱ्यांचे मे महिन्यापासूनचे मानधन थकीत आहे.
बॉक्स
एप्रिल महिन्याचा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक याचे वेतन देण्यात आले आहे. तर मे महिन्याचे एएनएम, जेएनएम व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले आहे. निधी आला नसल्याने इतर कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. येत्या दहा दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यात येणार आहे.
-सचिन रायपुरे, जिल्हाप्रमुख, ब्रिक्स इंडिया प्रा. लि., चंद्रपूर
बॉक्स
अनेक कर्मचाऱ्यांना केले कमी
तालुका प्रशासनाच्या परवानगीने प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये परिचारिका, सफाई कर्मचारी, सिक्युरिटी गॉर्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्याने तालुका प्रशासनाने संबंधित कंत्राटी कंपनीला पत्र देऊन कर्मचारी कमी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे काहींना केवळ एक महिना तर काहींना केवळ दोन महिनेच काम मिळाले. त्यातही वेतन प्रलंबित आहे.
बॉक्स
सध्या काम नाही, केलेल्या कामाचा मोबदला नाही
रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोविड सेंटरमध्ये काम नसल्याचे सांगून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. मात्र, ऐन कोरोनाच्या दहशतीत जीव धोक्यात घालून प्रामाणिक कर्तव्य बजावले. त्याचेही वेतन मिळाले नाही. सद्य:स्थितीत आता कोणतेही काम नाही. त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित देण्याची मागणी होत आहे.
-------
मान दिल्याने पोट नाही भरत
कोरोनाकाळात आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत असल्याने कोरोना योद्धा म्हणून संबोधले जाते. अनेकांनी तर योद्धा म्हणून सत्कार केला; परंतु केवळ मान दिल्याने पोट भरत नाही. त्यामुळे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे.
-परिचारिका
------
खासगी रुग्णालयात काम करीत असतानाच कोविड रुग्णालयात कर्मचारी कमी असल्याची माहिती मिळाली. राष्ट्रहिताचे काम म्हणून तेथे काम सुरू केेले. प्रामाणिकपणे सेवाही बजावली. अनेकांकडून कौतुकही झाले; परंतु अद्यापही वेतन प्रलंबित आहेत.
- परिचारिका
------
कोरोनाने मृत्यू झालेल्यांना आप्तेष्टही टाळत असताना आम्ही जीव धोक्यात घालून मृतकांचे विधिवत अंत्यसंस्कार केले. आमच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला; परंतु प्रशासनाकडून वेतन वेळेवर देण्यात येत नाही.
-सुरक्षा रक्षक