बस रोखून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
By Admin | Updated: August 1, 2015 00:58 IST2015-08-01T00:58:31+5:302015-08-01T00:58:31+5:30
एकाच मार्गावरील अनेक गावातून एसटी बस जात असल्याने बसमध्ये विद्यार्थी खचाखच भरीत होते.

बस रोखून विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
वरोरा : एकाच मार्गावरील अनेक गावातून एसटी बस जात असल्याने बसमध्ये विद्यार्थी खचाखच भरीत होते. त्यामुळे इतर गावातील विद्यार्थ्यांना जागा नसल्याने बस थांबत नव्हती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत निर्धारीत वेळेत पोहोचता येत नव्हते. यामुळे अतिरिक्त एसटी बस सोेडावी याकरीता शुक्रवारी वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (रेल्वे) येथे शालेय विद्यार्थ्यांनी एसटी बस रस्त्यात रोखून धरून आंदोलन केले.
वरोरा एसटी आगाराची वरोरा दहेगाव ही बस नियमित सोडण्यात येते. शालेय वेळेवर असल्याने या एसटी बसमध्ये दहेगाव मधील विद्यार्थी बसत असतात. त्यानंतर डोंगरगाव व इतर गावातील विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये बसण्यास जागा राहत नव्हती. ही एसटी बस सोडल्यास विद्यार्थ्यांजवळ शाळेत पोहचण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे सदर एसटीबस वरोरा दहेगाव व डोंगरगाव (रेल्वे) पर्यंत सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांसह मनसे शहर प्रमुख मनीष जेठाणी यांनी एसटी महामंडळाकडे व शिक्षण विभागाच्या वतीने काही दिवसापूर्वी लेखी स्वरुपात केली होती. वारंवार मागणी करुनही एसटी बस डोंगरगावपर्यंत सोडत नसल्याने मागील एक महिन्यापासून शाळेत जाताना उपस्थितीत अनियमितपणा येत होता. अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोंगरगाव रस्त्यावर एसटी बस रोखून धरली. या घटनने प्रशासनातील अधिकारी व मनिष जेठाणी, राजु बन्सोड, अजय गांजरे, जयंत मारोडकर यांनी घटनास्थळी धाव घेवून शालेय विद्यार्थ्यांची समजूत घातली व १ आॅगस्टपासून बस डोंगरगावपर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)