११ हजार ३६४ उमेदवारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:24+5:302021-01-18T04:25:24+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यासाठी ११ हजार ३६४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून ...

Judgment of 11 thousand 364 candidates today | ११ हजार ३६४ उमेदवारांचा आज फैसला

११ हजार ३६४ उमेदवारांचा आज फैसला

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यासाठी ११ हजार ३६४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून यातून चार हजार १९१ उमेदवार निवडून द्यायचे आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या नजरा उद्या लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. मतदानाच्या टक्केवारीवरून गावपुढाऱ्यांनी अंदाज लावणे सुरू केले आहे. दरम्यान, प्रशासनाने निकालाची तयारी पूर्ण केली असून तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे.

सोमवारी सकाळी तालुकास्तरावर मतमोजणी होणार असून गावनिहाय टेबल लावण्यात येणार आहे. सध्या गावांमध्ये कोण येणार, कोण हरणार, यावर चर्चा रंगत आहे. तर, काही जण पैज लावून आपलाच अंदाज खरा ठरेल, असेही ठासून सांगत आहे. विशेष म्हणजे, काही गावांत अटीतटीमध्ये निवडणूक पार पडली. दरम्यान, काहींनी आतापासूनच गुलाल तसेच बॅण्डबाजाही बुक केला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा उद्या सकाळी १० वाजताच्या ठोक्याकडे लागल्या असून गुलाल उधळणीसाठी सर्वच जण सज्ज झाले आहे.

---

सरपंच आरक्षण कुणाचे?

यावर्षी पहिल्यांदाच सरपंचाचे आरक्षण न काढता ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यामुळे पॅनल लढविताना अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. पैसा खर्च करूनही सरपंचपद भेटेलच, याची शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता ग्रामस्थांचे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.

बंदोबस्तात वाढ

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीच्या वेळी वाद झाले होते. एवढेच नाही तर चिमूर तालुक्यात मारहाणही झाली होती. त्यामुळे गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मतमोजणीदरम्यान, कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मतमोजणी केंद्रांवर अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

----

निवडणुकीचे चित्र

ग्रामपंचायतींची संख्या

४०६

एकूण उमेदवार ११,३६४

--

तालुकानिहाय ग्रामपंचायती

चंद्रपूर- ३७

बल्लारपूर- १०

भद्रावती- ५३

वरोरा- ७८

कोरोना- १६

राजुरा- २८

जिवती- १

गोंडपिंपरी- ४३

पोंभूर्णा- २७

सावली- ५०

सिंदेवाही- ४५

मूल- ३७

ब्रह्मपुरी- ६८

नागभीड- ४१

चिमूर- ८०

----

बिनविरोध ठरलेल्या ग्रामपंचायती

कोरपपना तालुक्यातील शेरज खु. गोंडपिंपरीतील चेक बेरडी, मूलमध्ये राजगड, उथळपेठ, ब्रह्मपुरीतील किन्ही, बोडधा, सिंदेवाहीत सामदा, सावलीमध्ये खेळी, चिमूर हिरवा, मसली, जवराबोडी, नागभीडमध्ये मेंढास, मांगरूढ, वरोरातील आनंदवन, बोरगाव मो, गुंजाळा, खेमजई, येवती, भद्रावती पानवडाळा, कोकेवाडा, कचराळा, विसापूर रै या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Judgment of 11 thousand 364 candidates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.