विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार
By Admin | Updated: March 23, 2015 01:13 IST2015-03-23T01:13:17+5:302015-03-23T01:13:17+5:30
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत.

विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार
भद्रावती : चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत. या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश चुधरी यांना भ्रमणध्वनीवरून दिले.
प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकापेक्षा अनेकांना नोकरीत सामावून घेण्यात आले असून, काहींना नोकरी देण्यासाठी कायद्यावर बोट ठेवून औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, पूर्नवसन अधिकारी हे अडवणूक करीत असल्याचा आरोप सरपंच प्रकाश चुधरी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राकरिता ५२ गावांच्या शेतजमीनी संपादीत करण्यात आल्या. यातील काही प्रकल्पग्रस्तांना शेती, घरे, वऱ्हांडा, झोपडी, गुरांचा गोठा यावरती नोकरीत सामावून घेण्यात आले. परंतु हाच निकष उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना लागू करण्यासाठी अधिकारी असमर्थता दर्शवित आहेत. एकाच कुटुंबातील अनेकांना तसेच प्रकल्पग्रस्तांशी नातेसंबंध जुळत नसलेल्या इतरांना नामनिर्देशनसाठी दिलेल्या पत्रावर या अधिकाऱ्यांनी नोकरीत सामावून घेतले आहे. वास्तविक पाहता नियमानुसार प्रकल्पग्रस्तांचे रक्तातील नाते संबंधितांनाच नोकरीचा अधिकार प्राप्त होतो. सरपंच चुधरी यांनी ही बाब वेळोवेळी पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अधिकाऱ्यांनी व्यवस्थीत उत्तर न देता डावलण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने चुधरी हे गेल्या तीन ते चार वर्षापासून संघर्ष करीत आहे. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षदा दिले. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संभाषण केले व ही बाब त्यांना सांगितली. (शहर प्रतिनिधी)