‘नवोदय’च्या वंचितांना न्याय
By Admin | Updated: February 7, 2015 00:34 IST2015-02-07T00:34:30+5:302015-02-07T00:34:30+5:30
पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत नवोदय परीक्षेपासून वंचित असलेल्या सात शाळांतील ५९ विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेला बसवण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

‘नवोदय’च्या वंचितांना न्याय
चंद्रपूर : पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत नवोदय परीक्षेपासून वंचित असलेल्या सात शाळांतील ५९ विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेला बसवण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. उद्या ७ फेब्रुवारीला होणाऱ्या पात्रता परीक्षेला हे विद्यार्थीही बसू शकतील. जिल्हा परिषद प्रशासन व पुरोगामी शिक्षक समितीने घेतलेल्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.
गोंडपिंपरी पंचायत समितीमधील काही शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र प्राप्त झाले नाही, अशी तक्रार पुरोगामी शिक्षण समितीला प्राप्त झाल्यानंतर नवोदय समितीचे जिल्हा प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत संघटनेने कल्पना दिली व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. योगायोगाने यावेळी जिल्हाधिकारीपदाचा प्रभार जि.प. चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडेच होता. सलिल यांनी त्वरीत लक्ष घालून ठिकठिकाणी संपर्क केला. शाळांकडून दुसरे अर्ज भरून नवोदय समिती दिल्लीकडे प्रस्ताव सादर केला. यावेळी शिक्षण सभापती देवराव भोंंगळे यांनी विशेष लक्ष देवून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले.
३ फेब्रुवारीला रात्री हे अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांनी विशेष दुताद्वारे नवोदय विद्यालय तळोधी येथे पोहोचते केले. अर्ज मंजुरीसाठीची उर्वरित प्रक्रिया करण्यासाठी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य साहेबेवार व कर्मचारी घमे, धाबर्डे यांनीही मोलाचे प्रयत्न केले. अशाप्रकारे अनेकांच्या सहकार्याने वंचित ५९ विद्यार्थ्यांना नवोदय पात्रता परीक्षेला बसण्याची अशक्यप्राप्त संधी प्राप्त झाली. पुरोेगामी शिक्षक समितीचे विजय भोगेकर, हरिश ससनकर, ब्रम्हानंद मडावी, निखील तांबोळी यांनी संपूर्ण घटनाक्रम प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
मात्र गोंडपिपरी पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती, हे विशेष (प्रतिनिधी)