मुनगंटीवार मंत्री झाल्याचा आनंद आणि अपेक्षाही
By Admin | Updated: November 3, 2014 23:23 IST2014-11-03T23:23:36+5:302014-11-03T23:23:36+5:30
सुधीर मुनगंटीवार हे कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद बल्लारपूर विधानसभेतील बहुतेक साऱ्यांनाच झाला आहे. मंत्रिमंडळात आपल्या विधानसभा क्षेत्राला प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल साऱ्यांनी

मुनगंटीवार मंत्री झाल्याचा आनंद आणि अपेक्षाही
बल्लारपूर : सुधीर मुनगंटीवार हे कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद बल्लारपूर विधानसभेतील बहुतेक साऱ्यांनाच झाला आहे. मंत्रिमंडळात आपल्या विधानसभा क्षेत्राला प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल साऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच मुनगंटीवार यांचेकडून आमदार आणि मंत्री म्हणून बरेचशा अपेक्षा ही जनसामान्यांनी ‘लोकमत’ जवळ बोलून दाखविल्यात.
भाजपाचे येथील ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल म्हणाले, आज आमच्याकरीता निश्चितच सोनियाचा दिवस ठरलाय. मुनगंटीवार हे प्रचारसभेत म्हणायचे आम्हाला सत्ता द्या, बल्लारपूर क्षेत्राचा नेत्रदीपक असा विकास करु. मंत्री बनल्यानंतर ते दिलेली आश्वासन नक्कीच पूर्ण करतील असा ठाम विश्वास आहे. कारण ते दिलेली आश्वासनं पाळतातच, हे आजवर सर्वांनी अनुभवले आहे. या निवडणुकीतील मुनगंटीवार यांचे प्रतिस्पर्धी माजी नगराध्यक्ष आणि बल्लारपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी, मुनगंटीवार हे मुख्यमंत्री बनणारच या व्यक्त केलेल्या आत्मविश्वासाकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्रीच्या आशेवर पाणी फिरुन मंत्रिपदावरच समाधान त्यांना मानावे लागले, असे म्हणत त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. बल्लारपूरच्या नगराध्यक्षा काँग्रेसच्या छाया मडावी म्हणाल्या, लोकांच्या मुनगंटीवार यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी विकासाचे जे मोठे स्वप्न दाखविले, ते पूर्ण करण्याला त्यांची कसोटी लागणार आहे. बल्लारपूरच्या विकासार्थ त्यांनी जोमाने झटावे एवढेचा शिवसेनेचे नेते नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिक्की यादव यांनी मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केला.
सोबतच आपल्या पक्षाच्या लोकांसोबत इतर पक्षांच्या लोकांची कामे तेवढ्याच तळमळीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे यांनी भाजपाचे गरीबांच्या समस्येकडे लक्ष द्यावे आणि मुनगंटीवार यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
व्यापारी मंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश गहेरवाल म्हणाले, मुनगंटीवार यांची प्रतिमा विकासपुरुष अशी आहेत. ती आता अधिक उजळ होईल. कारण, ती क्षमता त्यांच्यात आहे. हरबंसलाल छाबडा यांनीही मुनगंटीवार यांच्या मंत्री बनण्यावर आनंद व्यक्त केला. चांगला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहेच. मंत्री म्हणूनही ते यशस्वी होतील, असा पूर्ण विश्वास आहे. विमल खेडेकर, रक्षा मिऱ्यालवार आणि सुशीला करमनकर यांनी मुनगंटीवार यांनी आजवर केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू नये, याची दक्षता मंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
दिगांबर वासेकर म्हणाले, शासकीय योजना गरजुंपर्यंत पोहोचल्या वा नाही याची काळजी मुनगंटीवार यांनी घ्यावी तसेच जनसंपर्क कार्यालय त्यांनी बल्लारपुरात उघडावे. भारिप बहुजन महासंघाचे संयोजक भारत थुलकर यांनी बल्लारपुरातील जमिनीच्या पट्टाकडे मुनगंटीवार यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे कारण हा ज्वलंत प्रश्न बरेच वर्षांपासून प्रलंबित आहे. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामधन सोमानी यांनी मुनगंटीवारांमध्ये विकास निधी खेचून आणण्याची क्षमता आहे. आणि या कारणाने, त्यांचेकडून विकासाची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरणार नाही, ते या भागातील लोकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील असा आत्मविश्वास दर्शविला. मुनगंटीवारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्यावतीने फटाके फोडून येथे आनंद व्यक्त करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)