पत्रकारांनी आपली विश्वासार्हता कायम ठेवावी
By Admin | Updated: February 1, 2015 22:54 IST2015-02-01T22:54:58+5:302015-02-01T22:54:58+5:30
लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन एकदाचे पाळले नाही तरी चालेल. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा फरक पडत नाही. परंतु पत्रकारांनी आपली प्रतिमा आणि विश्वासार्हता कायम ठेवली पाहिजे,

पत्रकारांनी आपली विश्वासार्हता कायम ठेवावी
विजय वडेट्टीवार : सावली येथे पत्रकार संघाच्यावतीने गुणवंतांचा सत्कार
चंद्रपूर : लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन एकदाचे पाळले नाही तरी चालेल. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा फरक पडत नाही. परंतु पत्रकारांनी आपली प्रतिमा आणि विश्वासार्हता कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ब्रह्मपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते सावली तालुका पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाप्रसंगी उद्घाटपर भाषणात बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मनातून इच्छा असावी लागते. त्यामुळे एकतर आश्वासन देऊ नये. दिले तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. केवळ पत्रकारांनीच प्रतिमा स्वच्छ ठेवावी, असे नाही तर लोकप्रतिनिधींनीसुद्धा आपली विश्वासार्हता कायम ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पत्रकार भवनात आयोजित सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, राज्य प्रतिनिधी बंडू लडके, जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार, पं.स. सावलीच्या सभापती चंदा लेनगुरे, सरपंच अतुल लेनगुरे, उपसभापती मंगला चिमड्यालवार, माजी सभापती राकेश गड्डमवार, प्रकाश रार्इंचवार चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष एन. व्ही. महावादीवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार संघाच्यावतीने तालुक्यातील १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात इयत्ता १० वीमध्ये तालुक्यात प्रथम आलेल्या वैभवी साईनाथ कंबलवार, द्वितीय संदीप बालाजी कोसरे यांना स्व. गणपत पाटील बोमनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख, स्मृतिचषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता १२ वीतील प्रथम प्रशांत ढेकलू झरकर, द्वितीय गीतेश मोरेश्वर भोयर यांना स्मृतिशेष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नि. ज. गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख, स्मृतिचषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी विभागातून तालुक्यात प्रथम आलेल्या सातव्या वर्गाची विद्यार्थिनी वैष्णवी ज्ञानेश्वर सिडाम हिला रोख, स्मृतिचषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित खासदार व आमदार यांचा आणि सावली पं.स.च्या सभापती व उपसभापती म्हणून निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार ना. वी. महावादीवार यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक यशवंत डोहणे यांनी केले. संचालक पत्रकार संघाचे सचिव प्रकाश लोनबले तर आभार गोपाल रायपुरे यांनी मानले. याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील बोमनवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सिडाम, सदस्य उमेश वाळके यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)