जिवतीचे तहसील कार्यालय वाऱ्यावर
By Admin | Updated: August 1, 2015 01:02 IST2015-08-01T01:00:35+5:302015-08-01T01:02:52+5:30
गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.

जिवतीचे तहसील कार्यालय वाऱ्यावर
नागरिकांना नाहक त्रास : तहसीलदारांसह कर्मचारी येतात उशिरा
शंकर चव्हाण जिवती
येथील महसुल विभागाचे कार्यालय म्हणजे ‘कुणीही या, अन् कधीही निघून जा’ अशीच स्थिती येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सेवा देण्यासाठी मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. मात्र मुख्यालयी राहणे तर सोडाच, पण वेळेवरही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उजेडात आला.
सेतूतील हेराफेरी नागरिकांच्या मुळावर
कार्यालयात असलेल्या सेतूचा हेतूच नागरिकांना कळेनासे झाले आहे. कुठलेही काम असो दाम दिल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे पहाडावरील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनतेची कामे सुलभ व लवकर व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात कंत्राटदार पद्धतीने सेतूची निर्मिती केली. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्यांनी आपला व्यवसायच बनविला आहे. पैसे दिल्यावर काम लवकर होतात आणि एखाद्याने नाही दिले तर त्याला विविध कारणे सांगून हेलपाटे मारायला लावतात. अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्यात, मात्र कार्यवाही कुणावरही झाल्याचे दिसत नाही.
कार्यालयात शुकशुकाट
प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता ११.३० वाजेपर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या खुर्च्या रिकाम्या तर होत्याच पण इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून बाहेर गप्पा ठोकत होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. आपली कामे लवकर व्हावी यासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या वेळेतच मोठी गर्दी केली होती. मात्र ११.३० वाजले तरी अधिकाऱ्यांचा पत्ता नाही. दरवाज्याजवळ ताटकळत उभे असलेली नागरिक वैतागली होती. साहेब कधी येणार याकडे सर्वांचे चातकासारखे डोळे लागले होते. कार्यालयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून गप्पा ठोकण्यात मग्न होती.
हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांसोबत नेहमीच घडत असतो. कधी तहसीलदारामुळे कामे अडकतात तर कधी पटवारी व लिपीकामुळे कामे रेंगाळली जातात. याचा त्रास होतो फक्त सर्वसामान्य नागरिकांना. जनतेची कामे वेळेवर व तातडीने व्हावी यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कुणीही मुख्यालयी राहत नाही. कर्मचारी राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर येथून ये-जा करतात. त्यामुळे वेळेवर कुणीच येत नाही. कार्यालयात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण थांबावे, यासाठी शासनाने ‘थंब’ मशिन बसविली. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे पहाडावरील नागरिकांची कामे रेंगाळली असून एकाच कामासाठी वारंवार चकरा मारावे लागत आहे. संबंधित विभाग मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.