पाणी टंचाईने होरपळतोय जिवती तालुका
By Admin | Updated: March 21, 2016 00:40 IST2016-03-21T00:40:17+5:302016-03-21T00:40:17+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही.

पाणी टंचाईने होरपळतोय जिवती तालुका
पाण्यासाठी पायपीट : गढूळ पाण्यावर जगतात जनावरे
संघरक्षीत तावाडे जिवती
चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही. दरवर्षी पाऊस पडत असला तरी हा तालुका उंच अशा पहाडावर वसला असल्याने पावसाचे पाणी पडते तसाच पहाडावरून घसरून निघून जाते. पाणी अडावे यासाठी नाल्यावर बांध नाहीत किंवा तलावही नाहीत. परिणामी उन्हाळ्यात महिलांना पायपीट करावी लागत आहे.
जिवती तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे स्रोत जरी असले तरी त्यात पाण्याचा साठा नसल्याने गावकऱ्यांना विशेष करून महिलांना गावाबाहेरील एखाद्या शेतातील विहिरीतून किंवा नाल्यातील पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते. नाले किंवा तलावातील पाणी सध्या कमी झाल्यामुळे जनावरांना मिळेल तेथील गढूळ पाणी पिऊन आपली तहाण भागवावी लागत आहे.
लोकप्रतिनिधी असो वा प्रशासन, यांचे नेहमीच जिवती तालुक्याकडे दुर्लक्ष राहिले आहे. नेहमी पाण्याची बोंब असताना तालुक्यातील जनतेला पाण्याची सोय करून देऊन पाणी पाजणारा खंबीर वाली मिळालेला नाही. नेहमी टँकरमुक्त तालुका करू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे पाणीटंचाईमुक्त तर सोडाच, पण मंजूर टँकरसुद्धा पाठवत नाहीत, ही येथील जनतेसाठी शोकांतिका आहे.
तालुक्यात गावाची संख्या ८३ आहे. त्यापैकी आजच्या घडीला १७ गावे ही पाणीटंचाईने होरपळत आहेत. अनेक आदिवासी गावात पाण्याची साधने नसल्याने एक ते दोन किमी अंतरावरून डोक्यावर किंवा बैलबंडीवरून पाणी आणावे लागते आहे. हातपंपाच्या बाबतीत ३५ ग्रामपंचायतीपैकी २८ ग्रा. प. कडे पाणी कराचे ८ लाख ४५ हजार रूपये थकबाकी होते. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार रूपये ग्रा.पं. ने भरले आहे. अजूनही ५ लाख रुपये बाकी असल्याने ही रक्कम आल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
जलस्वराज्य योजना कुचकामी
तालुक्यात जलस्वराज्य योजनेतंर्गत गावांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाने अनेक गावात योजना राबविली. पण गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद आहे. जिवती, लोलडोह, पुडियाल, मोहदा किंवा अन्य दोन-चार गावे सोडली तर ही योजना बाकी गावात फेल ठरली आहे. या योजनेतंर्गत कुठे टाकी तर कुठे विहीर तर कुठे केवळ पाईपलाईन टाकून अर्धवट कामे ठेवल्याचे दिसत आहे.
२८ गावातील हातपंप नादुरूस्त
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी थकबाकीचा आकड्याचा डोंगर वाढत चालला आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वसुली न देणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा, सोबतच बंद असलेली हातपंप दुरूस्त करायचा नाही. टंचाईच्या काळात घेतलेल्या या निर्णयाने पाणी टंचाईला आणखी ग्रहण लागलेले आहे.
अधिकाऱ्यांकडून टंचाईग्रस्त गावांना भेटी
पंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे व संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना गेल्या महिनाभरापासून भेटी देत आहेत. पाणीटंचाई वाढत असताना यांच्या भेटीने गावकऱ्यात आपुलकी निर्माण होत असून पाणी समस्या सोडविण्यासाठी ते काय उपाययोजना करतात, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.