विविध समस्यांनी जिवती तालुका बेजार
By Admin | Updated: November 8, 2014 22:35 IST2014-11-08T22:35:57+5:302014-11-08T22:35:57+5:30
निसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात

विविध समस्यांनी जिवती तालुका बेजार
शंकर चव्हाण - जिवती
निसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. याच तालुक्यात आंध्र-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अद्यापही संघर्ष सुरू आहे. या साऱ्या समस्यांबाबत शासन आणि प्रशासन अद्यापही गंभीर नाही.
दिवसेंदिवस निसर्गाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. ‘निर्सग साथ देईना, उत्पन्न हातात येईना’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी गावेच्या गावे मुलांना सोबत घेऊन स्थलांतरित होत आहेत. तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. रोजगार हमीची कामेसुद्धा सुरू झाली नाहीत.
दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या तालुक्यातील अनेक गावांत कुपोषणाचे प्रमाणही वाढत आहे. कुपोषणाच्या नावाखाली शासनाकडून अनुदान लाटणाऱ्या संस्थाही दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एकीकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी अनेक योजना राबविल्यानंतरही जिवती तालुक्यात वीज, आरोग्य, रस्ते, पाणी, शेतकऱ्यांचा जमिनीचा मालकी हक्क, ५० वर्षांच्या वास्तव्याच्या पुराव्याअभावी जातीचा दाखला काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची फरफट आजही कायम आहे. या समस्या कधी सुटणार, अशा विवंचनेत जिवती तालुक्यातील नागरिक आहेत. (तालुका प्रतिनिधी)