आशुतोष सलील : शासकीय वसतिगृह विद्यार्थ्यांचे संमेलन-क्रीडा स्पर्धाचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांनी परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या भरवशावर सर्व क्षेत्रात यश मिळवावे. परिश्रमातूनच यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. स्थानिक आदिवासी शासकीय वसतिगृह क्र. २ तुकूम आणि आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. १ येथे नुकतेच क्रीडा स्पर्धा, व स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी सलील बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलील होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दयानिधी उपस्थित होते. सर्वप्रथम महापुरूषांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहायक जिल्हाधिकारी दयानिधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखापरीक्षक वडेट्टीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र बागडदे, कोपुलवार, दीक्षित, बगडे आदी उपस्थित होते.या निमित्ताने अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात नाटिका, नकला, आदिवासी नृत्य, लावणी, पथनाट्य आदींचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरूषोत्तम मसराम, मनोज तलांडे, शंकर चौखे, अनिल मडावी, निखिल गजभे, विजय मेश्राम, किरण उईके आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
जिद्द, परिश्रमातूनच ुविद्यार्थ्यांना यशाची खात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:39 IST