जीबगाव सिंचन योजना बंद
By Admin | Updated: February 19, 2015 00:43 IST2015-02-19T00:43:35+5:302015-02-19T00:43:35+5:30
सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

जीबगाव सिंचन योजना बंद
सावली : सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही योजना तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंदावस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन सिंचनापासून अचानक वंचित झाली आहे. सिंचनाअभावी शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
वैनगंगा नदीच्या काठावरील देवटोक देवस्थानाजवळ जीबगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाला १९७८ मध्ये सुरुवात होऊन १९८२ मध्ये योजना पूर्णत्वास आली. त्यानंतर तालुक्यातील जीबगाव, पेठगाव माल, सिर्सी यासह अन्य गावातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून दोनदा पिके घेत होते. पाण्याच्या सुविधेने भरघोस पिके येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारायला लागले.
परंतु, काही दिवसातच या योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फडणवीस यांनी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून योजनेच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळेच योजनेत वारंवार बिघाड येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. योजनेतील बिघाडामुळे शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहून शेती करावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशातही हाती आलेल्या धानाला भाव नससल्याने कर्ज कसे फेडायचे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतपिकातून हाती आलेल्या पैशातून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा की कर्जाचे हप्ते फेडायचे, अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)