चंद्रपूर : नववर्षाच्या स्वागतात सर्वजण तल्लीन असताना विपरीत घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी सेवा बजावत असतात. अशा पोलीस कर्मचाऱ्यांना जेसीआय चंद्रपूर इलिटतर्फे नमन करण्यात आले. तसेच त्यांना त्यांच्या कार्यस्थळावर पोहोचून चहा वितरित करण्यात आला.
दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री व नववर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण चंद्रपूर शहर नववर्षाच्या स्वागतामध्ये गुंग असते. अशावेळी शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस शहरातील चौका-चौकांत, मुख्य रहदारीच्या ठिकाणी पहारा देत असतात. तसेच पेट्रोलिंगद्वारे शहर सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असतात. चंद्रपुरात कडाक्याची थंडी वाजत असूनदेखील पोलीस अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देशसेवेच्या समर्पित भावनेने कार्य करीत असल्यामुळे जेसीआय चंद्रपूर ईलीटतर्फे त्यांच्या कार्यस्थळावर जाऊन संस्थचे अध्यक्ष आर्क. आनंद मुंधडा यांनी पोलिसांना नमन केले. यावेळी त्यांना चहा वितरित करण्यात आला. याप्रसंगी आनंद मुंधडा, जयंत निमगडे, ॲड. आशिष मुंधडा, बिपीन भट्टड, पार्थ कंचर्लावार, रुपेश राठी, आदी उपस्थित होते.