जलजागृती सप्ताह अभियानाचा शुभारंभ
By Admin | Updated: March 19, 2016 00:45 IST2016-03-19T00:45:01+5:302016-03-19T00:45:01+5:30
द्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जलदिनानिमित्त १६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

जलजागृती सप्ताह अभियानाचा शुभारंभ
विद्यार्थ्यांचा सहभाग : विविध कार्यक्रमांतून पाणी वाचवा, पाणी जिरवाचा संदेश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जलदिनानिमित्त १६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये जनजागृती सप्ताहाची सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये या जनजागृती सप्ताहाची सुरुवात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या जलजागृती कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले म्हणाल्या, सजिवांच्या अस्तित्वासाठी पुरशा स्वच्छ पाण्याची उपलब्धता न झाल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही काळात नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळा अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणींचे झाले आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात निर्माण होणाऱ्या सततच्या अवर्षण पाणी टंचाईमुळे पाणी संकट वाढत आहे. राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य गरज आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय पाण्याचे प्रश्न संपणार नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, प्रदूषण रोखणे, पायाभुत सुविधांचे जतन करणे, पाण्यासंबंधीचे कायदे व नियमांचे पालण करणे याबाबत समाजात जागृती व साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. आज आपण जर पाण्याचे महत्त्व जाणले नाही तर शहरामध्ये पेट्रोलसोबत पाण्याचे पंप सुद्धा दिसू लागतील, असे ते म्हणाले.
या जनजागृती कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केली जाईल. जास्ती जास्त जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना पाण्याबद्दलची माहिती व पाण्याचे महत्त्व काय याबाबत माहिती देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या पाणी स्वच्छतेबाबत पोस्टरचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे तसेच संवर्ग विकास अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)