जांबुवंतरावांची चंद्रपूर-बल्लारपूर वारी ‘वाह रे शेर आ गया शेर’

By Admin | Updated: February 19, 2017 00:35 IST2017-02-19T00:35:45+5:302017-02-19T00:35:45+5:30

वेगळा व स्वतंत्र विदर्भ हा ज्यांचा शेवटपर्यंत श्वास राहिला आणि विदर्भाच्या मागणीकरिता शेर गर्जनेने क्रांतकारी विचार पेरत ‘विदर्भाचा शेर’ अशी लोकमान्यता ज्यांना लाभली,..

Jambuwantarwa's Chandrapur-Ballarpur wind 'Wah Ri Sher Lie Sher' | जांबुवंतरावांची चंद्रपूर-बल्लारपूर वारी ‘वाह रे शेर आ गया शेर’

जांबुवंतरावांची चंद्रपूर-बल्लारपूर वारी ‘वाह रे शेर आ गया शेर’

प्रामाणिक लढवय्ये काळाच्या पडद्याआड : जिल्ह्यात आले असतानाच्या आठवणींना उजाळा
वसंत खेडेकर बल्लारपूर
वेगळा व स्वतंत्र विदर्भ हा ज्यांचा शेवटपर्यंत श्वास राहिला आणि विदर्भाच्या मागणीकरिता शेर गर्जनेने क्रांतकारी विचार पेरत ‘विदर्भाचा शेर’ अशी लोकमान्यता ज्यांना लाभली, ते विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे जीवनकार्य चळवळीने भरले आहे. लोकांच्या पाठीशी उभे राहून ते अन्यायाविरुद्ध लढत राहिले. त्यांचा मुख्य लढा विदर्भ वेगळा व्हावा याकरिता होता. या साऱ्या चळवळीकरिता क्रांतीकारी आवाज व कार्याला शोभावे असे त्यांचे व्यक्तिमत्व आणि तोफ डागण्यासारखे त्यांचे प्रखर शब्द जनामनात क्रांतीची ज्योत पेटविण्यास समर्थ होते.
विदर्भ वेगळा का हवा! या करिता जनजागरण करीत ते विदर्भभर फिरले. चंद्रपुरात या संदर्भात ते कितीदा तरी येऊन गेले आहेत. त्यांना बघण्या व ऐकण्याकरिता लोक त्यांच्या सभेला स्वयंस्फूर्तीने येत असत. विदर्भ आंदोलन जोमात होते. विदर्भाकरिता लोक रस्त्यावर उतरले होते. त्या वेळेला चंद्रपुरात गांधी चौकात विदर्भ चंडिका मूर्तीची स्थापना केली होती. त्याप्रसंगी जांबुवंतराव यांचे जोरकस व स्फूर्ती देणारे भाषण झाले होते. त्याच दरम्यान चंद्रपूरला विदर्भाच्या मागणीकरिता महाविदर्भ संघर्ष समितीच्या वतीने कस्तुरबा प्राथमिक शाळेच्या पटांगणावर अधिवेशन झाले. अर्थात त्यात प्रमुख पाहुणे व वक्ते जांबुवंतराव हे होते. प्रचंड गर्दी अधिवेशनाला उसळली होती. येथूनच विदर्भ वेगळा आंदोलनाला धार मिळाली. जांबुवंतराव याच संदर्भात चंद्रपूरला बरेचदा येऊन गेले आहेत आणि विदर्भाप्रति लोकांच्या मनात ज्योत प्रज्वलीत ठेवत राहिले. त्यांना बघताच लोक उत्साहाने म्हणत- आया रे आया शेर आया..! बल्लारपूरलाही जांबुवंतराव दोनदा येऊन गेले. आताच्या जनता विद्यालयाच्या जागेवर मोठे पटांगण होते. तेथील त्यांची सभा गाजली होती. त्यावेळी विदर्भवाद्यांचे बल्लारपूरचे नेतृत्व अ‍ॅड. शंकरलाल खंडेलवाल हे सांभाळत होते. त्यांनी आपल्या भाषण शैलीने विदर्भवाद्यांच्या मनात जोश भरला होता. लोकांना त्यातून प्रेरणा मिळत असे.जांबुवंतराव क्रांतीकारी विचाराचे होते, त्यांच्या लिखाणातही तशीच धार होती. त्यासोबतच अभिनयाची आवडही त्यांना होती. त्यांनी एक हिंदी चित्रपट ‘जागो’ हा बनविला होता. कामगार तसेच अन्यायग्रस्त लोकांचे आंदोलन आणि त्यांच्या न्यायाकरिता पुढे आलेला क्रांतीकारी विचाराचा पुढारी असे त्याचे कथानक होते. पुढारी नायकाची भूमिक जांबुवंतराव यांनीच केली होती. ‘जागो’ हा चित्रपट चंद्रपूरला सपना टॉकीजमध्ये झळकला होता.

प्रतिक्रिया
सच्चा मित्र गमावला
जाबुवंतराव धोटे यांच्या अकाली निधनाने आमचा सच्चा मित्र गेल्याचे दु:ख झाले. त्यांनी चंद्रपूरला भेट दिल्यानंतर आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. मात्र आता त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ती कदापी भरू शकणार नाही.
-शांताराम पोटदुखे,
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री.
विदर्भ चळवळीतील शेर हरपला
जाबुवंतराव धोटे यांच्या जाण्याने विदर्भातील शेर गमावला आहे. विदर्भ राज्यासाठी त्यांनी लढा दिला होता. त्यामुळे विदर्भ चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. विदर्भाचे स्वतंत्र्य राज्य मिळवून देणे, हिच खरी त्यांना श्रद्धाजंली आहे.
-अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार.
चळवळीची मोठी हानी
जाबुवंतराव धोटे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लढाऊ आणि प्रामाणिक कार्यकर्ते होते. विदर्भासाठी त्यांनी जो लढा उभारला, तो सर्वश्रुत आहे. विदर्भाच्या या शेराच्या निधनाने चळवळीची हानी झाली आहे. एक लढाऊ व्यक्तिमत्व हरपले याचे दु:ख आहे.
-अ‍ॅड. एकनाथराव साळवे, माजी आमदार.
विदर्भाचा शेर गेला
विदर्भाचे आंदोलन जांबुवंतरावांनी आक्रमकतेने लढविले. ते विदर्भाचे शेर होते. त्यांच्या कार्यकाळातच वेगळा विदर्भ व्हायला हवा होता. सरकारने विदर्भ राज्य करून श्रध्दांजली द्यावी.
-अनिल दिकोंडवार

Web Title: Jambuwantarwa's Chandrapur-Ballarpur wind 'Wah Ri Sher Lie Sher'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.