पाणलोट पथक कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: November 2, 2015 00:58 IST2015-11-02T00:58:12+5:302015-11-02T00:58:12+5:30
केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात कृषी विभागामध्ये कार्यरत पाणलोट पथक सदस्य हे ग्रामीण भागात ...

पाणलोट पथक कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
चंद्रपूर : केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात कृषी विभागामध्ये कार्यरत पाणलोट पथक सदस्य हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या तसेच बचत गटांच्या विकासासाठी शासनाच्या योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांचे मानधन अजुनपर्यंत देण्यात आले नाही. मानधन कधी होणार या संबंधी वरिष्ठ अधिकारी काहीच सांगत नसल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दिवाळी सण आठ ते दहा दिवसांवर येवून ठेपला असून जिल्ह्यातील ८० पाणलोट पथक कर्मचाऱ्यांचे मानधन न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.
शासन एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस तसेच दिवाळी अग्रीम उपलब्ध करून देत आहे, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम करूनसुद्धा त्यांना कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे या संस्थेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प राबवीत असून या कार्यालयातर्फे सप्टेंबर महिन्याचे मानधन देण्याच्या सूचना असूनसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले नाही. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाधिकारी तसेच जिल्हा सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)