सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !
By Admin | Updated: February 20, 2015 00:48 IST2015-02-20T00:48:50+5:302015-02-20T00:48:50+5:30
वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे.

सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !
सास्ती : वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ योजना सुरू करण्यात आली. परंतु तब्बल सहा वर्ष लोटूनही येथील नागरिकांची तहान भागविण्यास ही नळयोजनना कुचकामी ठरली आहे. येथील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहे.
राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत निमणी प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत सन २००९ मध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. वर्धा नदीवरून पाणी घेऊन कवठाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार जैतापूर येथील जलकुंभाला पाईप लाईन जोडून पाणी पुरवठा केला. मात्र आज या नळयोजनेला पाच ते सहा वर्षे होऊनही हे जलकुंभ अजूनही तहाणलेलेच आहे.
जैतापूर हे गाव नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. जैतापूर येथे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु गावाच्या विकासाकडे नेहमी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येकडे ग्रामपंचायतीकडून अनामत रक्कम भरली नाही म्हणून उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवतात. जिथे शासन प्रत्येक ठिकाणी कोणतेही कारण समोर न करता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी उपाय योजना करीत आहे. तिथे जैतापूरसारख्या गावच्या जनतेला नळाच्या पाण्यातून अलिप्त रहावे लागत आहे. येथील जनतेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.
जैतापूर हे गाव राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे विजेचा पुरठाही कमी दाबाचा होतो. त्यामुळे काही लोकांच्या घरी बोअरवेल असून त्यावरील पंप उन्हाळ्याच्या दिवसात चालत नाही. हीसुद्धा समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. (वार्ताहर)