जैतापूर रस्त्याचे काम बंद पाडले !
By Admin | Updated: March 30, 2016 01:23 IST2016-03-30T01:23:43+5:302016-03-30T01:23:43+5:30
अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.

जैतापूर रस्त्याचे काम बंद पाडले !
अंदाजपत्रकाप्रमाणे काम नाही : नागरिक उतरले रस्त्यावर
सास्ती: अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.
राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर, किन्होबोडी, मारडा, कुर्ली, भोयगाव, पेल्लोरा, नवेगाव, निमणी या दुर्गम भागाचा फायदा कंत्राटदारांनी आजवर घेतल्याचे दिसून येत आहे. कधी अवैध उत्खनन करुन तर कधी, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता मनाला वाटेल त्या पद्धतीने काम करणे, असे कंत्राटदारांचे समिकरण आहे. जैतापूर भोयगाव हा परिसर तालुक्याच्या ठिकाणाहून ५० किमी अंतरावर येत असल्याने या ठिकाणापर्यंत कधीच मोठे अधिकारी येत नसल्याने कंत्राटदार तलाठ्यासोबत आर्थिक व्यवहार करुन काम करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचांदूर अंतर्गत जैतापूर ते भोयगाव या २.५ किमी अंतराचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. कंत्राटदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे गावाजवळील काम केले. परंतु अर्धे काम झाल्यानंतर मनमर्जीने काम सुरु केले. यात रवाळीचा व मुरुमाचा डबल थर असताना त्यांनी एकाच थरावर डांबर टाकणे सुरु केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अभियंत्यासोबत बोलणे करुन संबंधित कंत्राटदाराचे काम बंद पाडले.
गावकऱ्यांच्या चातुर्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे झाले. आधीच विकास कामाच्या बाबतीत दुर्लक्षित गाव. गावाबाहेर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम आले आणि तेही निकृष्ठ दर्जाचे. यामुळे गावकऱ्यांच्या मनात प्रशासनाबद्दल रोष दिसून येत आहे.
नुकतीच याच ठिकाणाहून जागृत युवकांनी आपले सरकार या सरकारच्या आॅनलाईन संकेतस्थळावर नांदगाव- जैतापूर रस्त्याच्या कामाची तक्रार केली असता प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन पुणे येथील चौकशी समितीला जैतापुरात येऊन कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदाराला अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण करुन देण्याचे आदेश दिले. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच गावात अशाप्रकारची हिंमत कंत्राटदाराकडून करणे म्हणजे ढिसाळ प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे उदाहरण आहे, असे समजल्यास वावगे ठरणार नाही.
या परिसरात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. येथील प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालत आहे. हा संपूर्ण कारभार अर्थपूर्ण सुरु असल्यामुळे कंत्राटदारसुद्धा आपल्या बुद्धीला सुचेल त्याप्रमाणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.