‘जय श्रीराम’चा निनादला गजर
By Admin | Updated: March 29, 2015 01:10 IST2015-03-29T01:10:28+5:302015-03-29T01:10:28+5:30
विविध देखावे, ढोलताशाचा गजर, फटक्यांची आतिषबाजी, ध्वनीक्षेपकांवर अविरत सुरू असलेली श्रीराम भजनमाला, ...

‘जय श्रीराम’चा निनादला गजर
चंद्रपूर: विविध देखावे, ढोलताशाचा गजर, फटक्यांची आतिषबाजी, ध्वनीक्षेपकांवर अविरत सुरू असलेली श्रीराम भजनमाला, अशा भक्तमय वातावरणात श्रीरामाच्या जयघोषात निघालेल्या प्रभु रामचंद्राच्या शोभायात्रेने शनिवारी चंद्रपूर दुमदुमले.
श्री रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी श्री काळाराम मंदिरात अतिशय श्रध्दापूर्वक पूजा करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग अक्षरश: सजविण्यात आले होते. दर १०-१२ फुटांवर विविध सामाजिक संस्थेतर्फे स्वागत गेट उभारण्यात आले होते. रस्त्यांच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सायंकाळी ६ वाजता येथील श्री काळराम मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही शोभायात्रा गांधी चौकात पोहचली. प्रभु राम आणि सिता, राम-लक्ष्मण यांना खाद्यांवर बसविलेले हनुमान आदी अनेक देखावे लक्ष वेधून घेत होते. ढोलताशाच्या गजरात भाविकांचे पायही थिरकताना दिसत होते. सर्वधर्म समभाव व समरसतेचे प्रतिक ठरणाऱ्या या शोभायात्रेत भाविकांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर प्रभु रामचंद्राच्या पूजेची व्यवस्था करण्यात आली होती.
ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. सन्मित्र चौकात सन्मित्र मंडळ, जैन भवनासमोर व्यापारी मित्र मंडळ आदींनी शोभायात्रा पोहचताच श्रीरामांची विधीवत पूजा केली. गांधी चौक ते जटपुरा गेट आणि कस्तुरबा मार्गावरून जटपुरा गेट ते गिरनार चौकापर्यंत विद्युत रोषणाई केली होती. विविध सामाजिक संघटनांतर्फे भाविकांसाठी महाप्रसाद, शरबत व पाण्याचे वितरण करण्यात येत होते. यशस्वीतेसाठी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत होते. (नगर प्रतिनिधी)