स्मार्टऐवजी आता होणार सुंदर गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:19+5:302021-01-18T04:25:19+5:30
चंद्रपूर : ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यातील गावे विकासाच्या प्रवाहात यावी, म्हणून विविध पुरस्कार योजना राबविण्यात येते. स्मार्ट ग्राम योजनेमुळे ...

स्मार्टऐवजी आता होणार सुंदर गाव
चंद्रपूर : ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यातील गावे विकासाच्या प्रवाहात यावी, म्हणून विविध पुरस्कार योजना राबविण्यात येते. स्मार्ट ग्राम योजनेमुळे अनेक गावांना प्रोत्साहन मिळाले. आता या योजनेचे नामकरण सुंदर गाव असे झाले असून, पुरस्कारातही शासनाने लाखोंची वाढ केली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सहभागी ग्रामपंचायतीत विकासात्मक कामांची चुरस होणार आहेत.
स्मार्ट ग्राम योजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना केली. आधी स्मार्ट ग्राम योजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना दहा लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्कार देण्यात येत होता. आता सुंदर गाव स्पर्धेत पुरस्कार रकमेत ग्रामविकास विभागाने वाढ केली आहे. तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ५० लाख असा एकूण ७० लाखांचा जिल्हा सुंदर गाव पुरस्कार देण्यात येणार आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना हा निधी सुजलाम सुफलाम करणारा ठरणार आहे. विशेषता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस ७० लाखांचा पुरस्कार मिळणार असल्याने ग्रामपंचायतीत चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.
बॉक्स
गावात करणारी कामे
अपारंपरिक ऊर्जा व संबंधित अभिनव उपक्रम, स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, महिला सक्षमीकरण व मुलांना अनुकूल प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली, आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्त्वे, संकलन आणि तपासणी सूची तयार करून दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प, सौर पथदिवे, इंटरनेट वाय-फाय सीस्टिम आदी बाबींवर या पुरस्कार निधीतून गावात कामे केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने पुरस्काराच्या रकमेत लाखोंची वाढ केल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळणार आहे.