चंद्रपूर शहर विकासाकरिता अतिक्रमण हटविणे आवश्यक
By Admin | Updated: August 5, 2015 01:19 IST2015-08-05T01:19:22+5:302015-08-05T01:19:22+5:30
चंद्रपूर शहराच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्या झालेल्या आहेत. कॉलन्यांमध्ये ओपन स्पेससुद्धा आहेत.

चंद्रपूर शहर विकासाकरिता अतिक्रमण हटविणे आवश्यक
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्या झालेल्या आहेत. कॉलन्यांमध्ये ओपन स्पेससुद्धा आहेत. शहराच्या विकासाकरिता बरेच कामे मंजूर केलेली आहेत. मात्र विकास कामे करीत असताना रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे काम मनपा प्रशासन करीत नाही. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून मनपाने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता संयुक्त विकास समिती मागील ३० वर्षापासून आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून मनपाचे आणि प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने दिली आहेत. त्याची दखलसुद्धा घेण्यात आली आहे. मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे.
पूरग्रस्त भागातील कॉलन्यातील सर्व रस्ते व नाल्या हे सिमेंट कॉक्रीटचे करणे गरजेचे आहे. शहरातील नगिनाबाग, रामनग, जगन्नाथबाबा नगर, रेव्हेन्यु कॉलनी, शेंडे लेआऊट, हरिओम नगर, सिस्टर कॉलनी, रहमत नगर, सुगम नगर, नगिनाबाग, प्रोफेसर कॉलनी, बुद्ध नगर वसाहत स्वावलंबीनगर, ठक्कर कॉलनी, गुलमोहर कॉलनी या परिसरातील अनेक रस्ते व नाल्या अजूपर्यंत सिमेंट काँक्रिटचे झालेल्या नाही. इरई नदीचे खोलीकरण, इरई नदीवरील पुलाचे बांधकाम, जगन्नाथ बाबानगर कडून स्वावलंबीनगरकडे इरई नदीकडे मिळणाऱ्या मोठ्या नाल्याचे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.
बिनबा गेट ते रामनगरकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. त्याचप्रमाणे जटपूरा गेट ते ठक्कर कॉलनीकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा मुख्य रस्ता, सवाली बंगला चौक ते हिस्लॉप कॉलेज पर्यंत झालेला नाही.
सर्व कॉलन्यामधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण झालेले नाही. शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनाच्या वर्दळीमुळे कॉलनीत अनेक अपघात होत आहे. विकासाच्या आड येणाऱ्यांना प्रशासनाचा हिसका दाखविणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावरुन बहुतेक ठिकाणी अतिक्रमण वाढली आहेत. त्यामुळे मनपाने विकासाकरिता अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे, असे संयुक्त विकास समितीचे कार्याध्यक्ष शंकरराव सागोरे यांनी म्हटले आहे.
शहराच्या विकासाबाबत प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावतुरे, हिवराज गावंडे, भैया तोतडे, प्रा. अंबादास रायपुरे, शंकर कुंडले, प्रा. सुरेश विधाते, तुकाराम झाडे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पुराची समस्या कायम
४चंद्रपूर शहरातील अनेक नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागतो. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे. ईरई नदीचे पूर चंद्रपुरातील अनेक वॉर्डवासींना डोकेदुखीचे ठरत आहे. मात्र दरवर्षीच प्रशासन उपायोजना करण्यात अपयशी ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.